
Shashi Tharoor : शशि थरूर करणार टीव्ही होस्ट म्हणून पदार्पण; रामायणाचा आशियातील प्रवास उलगडणार
Shashi Tharoor : काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध लेखक शशि थरूर लवकरच एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ते पहिल्यांदाच टीव्ही होस्ट म्हणून पदार्पण करत असून, डिस्कव्हरीच्या आगामी ‘इतिहास : रामायण बियॉन्ड बॉर्डर्स’ या डॉक्युमेंटरी मालिकेचे सूत्रसंचालन करणार आहेत. चार भागांच्या या मालिकेचा प्रीमियर 7 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे.
या मालिकेच्या माध्यमातून रामायणाचा भारतापासून आशियातील विविध देशांपर्यंत झालेला प्रवास उलगडण्यात येणार आहे. भगवान राम, सीता, हनुमान आणि रावण यांसारख्या प्रमुख पात्रांच्या माध्यमातून रामायणाच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक रूपांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जाणार आहे. निर्मात्यांनी या मालिकेचा प्रोमोही प्रदर्शित केला आहे.
या नव्या प्रकल्पाबाबत शशि थरूर यांनी सांगितले की, धार्मिक महत्त्वाबरोबरच साहित्याच्या दृष्टीनेही रामायण हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. शतकानुशतके आणि विविध संस्कृतींमधून प्रवास करणारी ही कथा आहे. रामायणाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांचा त्यांनी अनेक वर्षे अभ्यास केला आहे. प्रत्येक आवृत्ती त्या-त्या समाजाची संस्कृती आणि विचारविश्व उलगडते, असे त्यांनी नमूद केले.
डिस्कव्हरीने रामायणाच्या आशियातील प्रवासावर आधारित मालिकेचे सूत्रसंचालन करण्यासाठी संपर्क साधला, तेव्हा हा निर्णय घेणे सोपे होते, असेही थरूर म्हणाले. रामायणातील समृद्धता आणि विविध संस्कृतींवरील त्याचा प्रभाव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
One epic. Many cultures. A journey across borders. Join Dr @ShashiTharoor in ITIHASA: Ramayana Beyond Borders, exploring the epic across cultures. Premieres 7 Dec, 9 PM on Discovery Channel & discovery+ via Prime Video Channels, JioTV, JioTV+, Tata Play Binge, Vzy & Playbox TV. https://t.co/NDyuJcvSwo — Office of Dr Shashi Tharoor (@TharoorOffice) November 19, 2026
या चार भागांच्या मालिकेत रामायणाची कथा कंबोडिया, श्रीलंका आणि थायलंडसह फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि मलेशियापर्यंत कशी पोहोचली, याचा वेध घेतला जाणार आहे. या देशांमधील रामायणाशी संबंधित श्रद्धा, कथा आणि सांस्कृतिक प्रभावही मालिकेतून समोर आणला जाणार आहे.
‘इतिहास : रामायण बियॉन्ड बॉर्डर्स’ या मालिकेचे सह-दिग्दर्शन सुजाता कुलश्रेष्ठ आणि अभिमन्यू तिवारी यांनी केले आहे. वाइड अँगल फिल्म्सने या मालिकेची निर्मिती केली आहे.
ही मालिका 7 डिसेंबर 2026 रोजी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी आणि डिस्कव्हरी प्लसवर प्रदर्शित होईल. मालिकेचा प्रत्येक भाग दर आठवड्याला प्रसारित केला जाणार आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, बंगाली, मल्याळम आणि कन्नडसह विविध भाषांमध्ये प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे.
Ans: ते डिस्कव्हरीच्या 'इतिहास : रामायण बियॉन्ड बॉर्डर्स' या डॉक्युमेंटरी मालिकेचे सूत्रसंचालन करणार आहेत.
Ans: रामायणाचा भारतातून आशियातील विविध देशांपर्यंत झालेला प्रवास आणि त्या देशांमधील रामायणाचा सांस्कृतिक प्रभाव पाहायला मिळणार आहे.
Ans: कंबोडिया, श्रीलंका, थायलंड, फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधील रामायणाचा प्रभाव दाखवला जाणार आहे.