
'आता जबाबदारीनंतर सुधारणा हव्यात'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया
Sonam Wangchuk On Dharmendra Pradhan Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पहिली प्रतिक्रिया देत हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले आहे. NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी जंतर-मंतर येथे तसेच नंतर सफदरजंग आणि मेदांता रुग्णालयात आमरण उपोषण केले होते.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वांगचुक यांनी सांगितले की, “हा लोकशाहीचा विजय आहे. रस्त्यावर उतरलेल्या जनतेच्या थेट लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे. सीजेपी, देशातील Gen Z तरुणांचे आणि भीती झुगारून देशाच्या कानाकोपऱ्यातून उभे राहिलेल्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन. आता जबाबदारी निश्चित करून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची वेळ आली आहे.”
Sonam Wangchuk Demands Accepted: केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या कोणत्या तीन अटी मान्य केल्या?
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले असले तरी विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप संपले नसल्याचे स्पष्ट केले आहे. जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके, प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी सरकारकडून तीन प्रमुख मागण्यांवर लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले.
सरकारसोबत झालेल्या चर्चेत CJP प्रतिनिधींनी पुढील तीन मागण्या मांडल्या होत्या.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.
NEET पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत.
आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेणे.
यापैकी शेवटच्या दोन मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली होती, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय नंतर जाहीर केला जाईल, असे सांगितले होते. या बैठकीत केंद्र सरकारतर्फे जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह सहभागी झाले होते.
यापूर्वी सोनम वांगचुक यांनी सरकारशी कोणतीही तडजोड केल्याच्या आरोपांचे खंडन केले होते. त्यांनी सांगितले की, सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांनी 26 दिवसांचे आमरण उपोषण मागे घेतले. आंदोलनातील विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, याची लिखित हमी मिळाल्यानंतरच त्यांनी उपोषण सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वांगचुक यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करत सफदरजंग रुग्णालयातील सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या वादाचे दृश्यही दाखवले. या व्हिडिओमध्ये त्यांनी, “मला अटक करा किंवा मला येथून जाऊ द्या,” अशी मागणी केल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांविरोधात कोणतीही दडपशाही किंवा हिंसक कारवाई होऊ नये, यासाठीच आपण उपोषण मागे घेतल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.