Sanjay Kumar News: लोकनीती-सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. संजय कुमार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीशी संबंधित चुकीचा डेटा ट्विट केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात एक एफआयआर नागपूर आणि दुसरी नाशिक या ठिकाणी नोंदवण्यात आली होता. या प्रकरणी न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे. तसेच, मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य सरकार आणि तक्रारदारांना नोटीस बजावली आहे.
निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांच्याविरुद्ध नागपूरमधील रामटेक पोलिस ठाण्यात चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये त्यांच्याविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल कऱण्यात आला होता. याशिवाय, मतदानात हेराफेरीचे खोटे आरोप केल्याबद्दल नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय कुमार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीची तपासणी करताना मतदारांच्या संख्येत मोठा बदल झाल्याचा दावा केला होता. रामटेक विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ३८.४५% ने कमी झाली आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी देवळाली परिसरातील ३६.८२% मतदारांची घट झाल्याचा दावा केला होता. पण या ट्विटनंतर संजय कुमार यांनी अवघ्या चोवीस तासांच्या आतच हे ट्विट डिलीट केले. इतकेच नव्हे तर, चुकीची माहिती पसरवल्या प्रकरणी त्यांनी माफीही मागितली. आमच्या टिमकडून चुकीचा डेटा वाचला गेला. चुकीची माहिती पसरवण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण संजय कुमार यांनी दिलं.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत संजय यांनी म्हटले आहे की, ‘ मी ३० वर्षांपासून निवडणूक विश्लेषणाशी संबंधित आहेत. मा आतापर्यंत निर्दोष आणि निष्पक्षपातीपणे काम केलं पण यावेळी आमच्या टीमची चूक झाली. त्यामुळे आमच्यावर मतदारांच्या डेटाबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. याबद्दल आपण आधीच चूक मान्य केली असून जाहीर माफीही मागितली आहे. अशा परिस्थितीत गुन्हा नोंदवणे योग्य नाही.
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या, CBI ने दाखल केला फौजदारी खटला, कंपन्यांचे शेअर्स कोसळले
संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी पोस्ट केली होती की, रामटेकमधील मतदारांची संख्या ४,६६,२०३ वरून २,८६,९३१ (३८.४५% घट) आणि देवळालीमध्ये ४,५६,०७२ वरून २,८८,१४१ (३६.८२% घट) झाली आहे. तथापि, १९ ऑगस्ट रोजी त्यांनी पोस्ट काढून माफी मागितली आणि सांगितले की त्यांच्या डेटा टीमने डेटा चुकीचा वाचला, ज्यामुळे ही चूक झाली. या प्रकरणामुळे राजकीय वाद निर्माण झाला. काँग्रेसने संजय कुमार यांच्या डेटाचा वापर करून मत चोरीचा आरोप केला, जो भाजपने फेटाळून लावला आणि तो खोटा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले. CSDS ला निधी देणाऱ्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (ICSSR) देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि CSDS ला कारणे दाखवा नोटीस बजावली. ICSSR ने आरोप केला की CSDS ने डेटामध्ये फेरफार करून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता खराब करण्याचा प्रयत्न केला, जे त्यांच्या निधी नियमांचे उल्लंघन असल्याचा दावाही करण्यात आला.