श्वानांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
राजधानी दिल्लीत एका ६ वर्षीय मुलीचा रेबीजमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर, देशभरात गंभीर बनलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येची आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. ही परिस्थिती ‘अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी’ असल्याचे नमूद करत न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी सुरू केली आहे. या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत.
दिल्लीतील एका हृदयद्रावक घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने दखल घेतली. दिल्लीच्या पूठ कलान परिसरातील छवी शर्मा या ६ वर्षांच्या चिमुकलीचा ३० जून रोजी एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र उपचारांनंतरही तिलारेबीजचा संसर्ग झाला. यात २६ जुलै रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेवर आणि योग्य उपचारांचा अभाव तसेच भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे भीषण परिणाम या घटनेमुळे अधोरेखित झाले.
शहरी, निमशहरी भागात उच्छाद :
आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, ‘शहरावर भटक्या कुत्र्यांचे संकट आणि त्याची किंमत मोजणारी मुले’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेले वृत्त अत्यंत त्रासदायक आहे. शहरी आणि निमशहरी भागांतून कुत्र्यांच्या चावण्याच्या शेकडो घटना समोर येत आहेत, ज्यामुळे अनेकदा रेबीजचा संसर्ग होतो. लहान मुले आणि वृद्ध या जीवघेण्या आजाराला बळी पडत आहेत. न्यायमूर्ती पारडीवाला यांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत असल्याचे स्पष्ट केलं. या प्रकरणाला ‘स्वतःहून दाखल केलेली रिट याचिका’ म्हणून हाताळण्याचे निर्देश न्यायालयाच्या नोंदणी विभागाला दिले. पुढील निर्देशांसाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे.
Mumbai 7/11 Bomb Blast : हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; आरोपी बाहेर की आत?
एक दिवस मॉर्निंग वॉकला जाऊन बघा
विशेष म्हणजे १५ जुलै रोजी, दुसऱ्या एका खंडपीठाने भटक्या कुत्र्यांना खाद्य पुरवण्याच्या मुद्यावर आणि सार्वजनिक सुरक्षेवर चिंता व्यक्त केली होती. नोएडा शहरात भटक्या कुत्र्यांना खाद्य जागा देण्यासाठी निश्चित ठरवण्याची मागणी करणारी याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर आली होती. त्यावर खंडपीठाने याचिकाकर्त्याला तुम्ही सकाळी सायकलिंगला जाता का? एक दिवस जाऊन बघा, म्हणजे काय होतं ते कळेल, असं म्हणत सुनावलं होतं. सायकलस्वार, सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आणि दुचाकीचालकांना निर्जन रस्त्यांवर आणि उद्यानांमध्ये भटक्या कुत्र्यांपासून कसा धोका असतो, याकडे न्यायालयाने लक्ष वेधलं होतं.न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले होते की, प्राण्यांसाठी जागा आहे, पण माणसांसाठी नाही. भटक्या कुत्र्यांना आणि गायींना खायला घालणाऱ्या उदारमतवादी लोकांसाठी आम्ही प्रत्येक रस्त्यावर वेगळी लेन तयार करायची का?