
Tejashwi Yadav as RJD working president due to Lalu Prasad Yadav health bihar news
Tejashwi Yadav as RJD working president : पटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा बिहार राजकारणामध्ये नवा ट्वीस्ट आला आहे. राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षाने नवा डाव खेळला आहे. निवडणुकीनंतर RJD ने पहिली मोठी धोरणात्मक बैठक घेतली आहे. पाटणा येथे होणाऱ्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत तेजस्वी यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बिहारच्या राजकारणाच्या भविष्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
राष्ट्रीय जनता दल (RJD) राष्ट्रीय कार्यकारिणीची बहुप्रतिक्षित बैठक आज, २५ जानेवारी रोजी बिहारची राजधानी पाटणा येथील हॉटेल मौर्य येथे पार पडली. सकाळी ११:३० वाजता सुरू झालेल्या या बैठकीत सहभागी होण्यासाठी देशभरातील २७ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष पटना येथे दाखल झाले आहेत. २०० हून अधिक प्रतिनिधी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व वरिष्ठ सदस्य उपस्थित आहेत.
हे देखील वाचा : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ९८२ कर्मचाऱ्यांचा शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मान
राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक झाली असून यामध्ये तेजस्वी यादव यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती यांच्यासह पक्षाचे जवळजवळ सर्व वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित होते. बिहार प्रदेश अध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी बैठकीदरम्यान तेजस्वी यादव यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली. आरजेडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भोला यादव यांनी हा प्रस्ताव मांडला. लालू प्रसाद यांच्या निर्देशानुसार पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाला कार्यकारी सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला. लालू प्रसाद यांच्या प्रकृती अस्वस्थ्यमुळे पक्षाने पहिल्यांदाच कार्यकारी अध्यक्ष निवडला आहे. तेजस्वी यांना अध्यक्षपदाचे अधिकार देण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : नरेंद्र मोदींनंतर कोण होणार पंतप्रधान? नितीन नबीन राजकारणाच्या पटलावरचे ठरणार प्यादे की वजीर?
या बैठकीत राष्ट्रीय जनता दल पक्षामध्ये केवळ नेतृत्व बदलच नाही तर शिस्तीवरही कडक चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध काम करणाऱ्या किंवा तोडफोडीत सहभागी असलेल्या नेत्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. बदलत्या राजकीय वातावरणात स्वतःला अधिक सक्रिय, आधुनिक आणि तळागाळात आणण्यासाठी राजद नेतृत्व आता मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची योजना आखत आहे. पक्षाचे ध्येय केवळ बिहारमध्ये गमावलेले स्थान परत मिळवणे नाही तर इतर राज्यांमध्येही त्यांचे संघटन वाढवणे आहे. याच दृष्टीने तेजस्वी यादव यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.