India-Pakistan War : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव कायम; पाच हजार नागरिकांचे झाले स्थलांतर
श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कायम असलेल्या तणावामुळे जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या गोळीबार आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, जम्मू प्रदेशातील किमान पाच जिल्ह्यांतील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. या गोळीबारात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 60 जण जखमी झाले आहेत.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी आणि मंत्री सतीश शर्मा यांच्यासह, जम्मू, राजौरी आणि सांबा जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या मदत छावण्यांना भेट दिली. त्यांनी विस्थापित लोकांना भेटले, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्या प्रत्येक गरजांची काळजी घेत आहे.
आतापर्यंत राजौरी आणि पूंछच्या सीमावर्ती भागातून 8 ते 10 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना मदत छावण्यांमध्ये अन्न, पाणी, औषधे आणि राहण्याची सुविधा पुरविली जात आहे. सर्व अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे, अशी माहिती मंत्री सतीश शर्मा यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची मदत केंद्रांना भेट
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मिश्रीवाला, नागबानी, बिश्नाह आणि थंडी खुई येथील मदत केंद्रांना भेट दिली आणि अधिकाऱ्यांना पूर्ण सतर्क राहण्याचे निर्देश दिले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जम्मू आणि आसपासच्या भागातील लोकांना घरातच राहण्याचे आणि अनावश्यकपणे रस्त्यावर न येण्याचे आवाहन केले.
चीनचा पाकिस्तानला पाठिंबा
पाकिस्तानकडून केले जात असलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने शनिवारी पहाटे पाकिस्तानातील सहा प्रमुख लष्करी हवाई तळांवर शक्तिशाली स्फोटाने उडवले. यात पाकिस्तानी लष्करी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव वाढत आहेत. असे असतानाच चीनने भारताविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.