ऐन दिवाळीच्या दिवशी उत्तराखंडवर संकट; उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा तुटला, 40 हून अधिक कामगार आत अडकले

उत्तराखंडमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळल्याने सुमारे 20-25 कामगार अडकले आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा येथे 200 मीटरपर्यंत ढिगारा पडला आहे. त्यात 800 मीटर अंतरावर कामगार अडकले आहेत.

    देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह पाहायला मिळत आहे. सगळीकडे उत्साहाचं वातवरण असताना उत्तराखंडवर मधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन बोगदा कोसळून अपघात (Uttarkashi tunnel Accident) झाला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगदा कोसळले आहे. या अपघातामुळे बोगद्यात काम करणारे सुमारे ४० कामगार अडकले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

    कसा घडला अपघात

    मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा ते दंडलगाव या मार्गावर  बोगद्यातं बांधकाम सुरू आहे. रविवारी पहाटे चारच्या सुमारास बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळला. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफचे बचाव पथक रवाना करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या सुमारे ४० मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.

    बोगद्यात अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजन पाईपद्वारे ऑक्सिजन दिला जात आहे. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बचाव पथकाकडून बोगद्याचा ढिगारा हटवण्यात येत आहे.

    चमोली जिल्ह्यातही बोगद्यात कामगार अडकले

    उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातही २०२१ मध्ये बोगद्यात कामगार अडकले होते. तपोवन बोगद्यात कामगार अडकले होते. बोगद्यातील ढिगारा हटविण्यासाठी जेसीबीसह डंपर तैनात करण्यात आले होते, मात्र अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतरही जिल्हा प्रशासनाला यश आले नाही.

    बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी नवीन मशिनद्वारे ड्रिल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून अनेक दिवसांपासून मदत आणि बचावकार्य सुरू होते. बोगद्यात अडकल्याने ५३ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.