'जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी..', ममता बनर्जींच्या मंत्र्यांचा नवा दावा (फोटो सौजन्य-ट्विटर)
बंगालचे मंत्री आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी जुलैच्या सुरुवातीला झालेल्या ‘ऑल इंडिया कुराण स्पर्धेत’ केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. ‘जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी आहेत. जर आपण त्यांना ‘दावत’ (इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण) देऊ शकलो आणि त्यांच्यात ‘इमान’ (इस्लामची भक्ती) आणू शकलो, तर आपण अल्लाला संतुष्ट करू शकू, असे विधान कोलकाता शहराचे महापौर तथा तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी ३ जुलै या दिवशी केले.
या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. हकीम कोलकाता येथील धोनो धोन्यो स्टेडियमवर ‘ऑल इंडिया कुराण स्पर्धे’च्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या विधानावरील वादाच्या दरम्यान स्पष्टीकरण देताना त्यांनी दावा केला की, त्यांची टिप्पणी ‘गैरसमज’ आहे आणि कोणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पश्चिम बंगालचे शहरी विकास मंत्री हकीम यांनी गुरुवारी विधानसभेत बोलताना सांगितले की, ते मुस्लिम असूनही दुर्गा पूजा आणि काली पूजा नियमितपणे आयोजित करतात.
जुलैमध्ये हकीम यांनी केलेल्या वक्तव्याला भाजप आमदारांनी विरोध केला होता. हकीम जेव्हा विधानसभेत आपले म्हणणे मांडण्यासाठी उभे राहिले, तेव्हा भाजपचे आमदार त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सभागृहातून सभात्याग करायचे. हकीम म्हणाले, “जेव्हा मी एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उभा राहतो तेव्हा ते सभागृहातून बाहेर पडतात हे पाहणे अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या कोणत्याही टिप्पण्यांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्यास मी काय करू शकतो? चीफ व्हिप डॉ. शंकर घोष यांच्यासह (भाजपचे) लोक मला धर्मनिरपेक्ष मानतात की नाही ते मला सांगतील का? मी धर्मनिरपेक्ष आहे हे सर्वांना माहीत आहे. या सभागृहाबाहेरील कार्यक्रमात केलेल्या माझ्या वक्तव्याचे राजकारण करणे योग्य नाही.
“मी कधीही इतर कोणत्याही धर्माच्या लोकांचा अपमान केला नाही आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी असे करणार नाही.” मी इतर धर्माच्या लोकांचा आदर करतो. मी इस्लाम धर्माचा आहे, पण मी नियमितपणे दुर्गा पूजा आणि काली पूजा ही करत असतो. माझ्या टिप्पण्यांचे विनाकारण राजकारण केले जात आहे. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझा जन्म धर्मनिरपेक्ष कुटुंबात झाला आणि भविष्यातही असेच राहीन.
यावर वक्त्व्याला विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी म्हणाले की, हकीम यांनी ज्या पद्धतीने त्यांचे म्हणणे स्पष्ट केले त्याच्याशी मी सहमत आहे. “तुम्हाला त्या कार्यक्रमाला महापौर आणि मंत्री म्हणून बोलावले होते. तुम्ही तिथे काय बोललात ते मी म्हणत नाही. तुमच्या भाषणाचा पहिला भाग योग्य होता, पण दुसऱ्या भागात तुम्ही इतर धर्माच्या लोकांनाही तुम्ही ज्या धर्माला मानता त्या धर्मात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तुम्ही माफी मागावी अशी आमची इच्छा नाही पण ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांची तुम्ही माफी मागावी अशी आमची इच्छा आहे. एका विशिष्ट धर्माचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याने आपण तेथे गेल्याचे हकीम यांनी सांगितले.