मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
नाशिक: केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली. रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग, रामकाल पथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. रामकुंड, सीता गुंफा, काळाराम मंदिर, राम लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्व जगभरात पोहोचविण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या साह्याने हा प्रकल्प उभारला जात आहे. देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने आणि या पवित्र स्थळाचे स्थान महात्म्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. रामकाल पथ प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देत दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
फडणवीस सरकारचा धमाका! एकाच दिवसात ३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.
LIVE | 'सिंहस्थ कुंभमेळा 2027'साठी विविध विकास कामांचे भूमिपूजन 🕒 दु. ३.१३ वा. | १३-११-२०२५📍नाशिक.#Maharashtra #Nashik #KumbhaMela https://t.co/nTHaWDR5sN — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 13, 2025
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे. सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून जिल्हा परिषद इमारतीचे उद्घाटन केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांचे स्वागत केले.






