नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. एकीकडे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराज नेते बंडखोरीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजप डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करत आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करून दोन्ही खेळाडूंच्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा हेही उपस्थित होते.
हेदेखील वाचा: सगेसोयरे आरक्षण कोर्टात एक मिनिटही टिकणार नाही; भूजबळांनी जरांगेंना डिवचलं
विनेश फोगट यांनी पक्षात प्रवेश करताच काँग्रेस पक्षाचे आभार मानले. तर भाजपवर सडकून टीकाही केली. विनेश म्हणाली की, संकटाच्या काळात तुम्हाला तुमचा कोण आहे हे कळते. जेव्हा आम्हाला रस्त्यावर ओढले जात होते तेव्हा भाजप वगळता सर्व पक्ष आमच्यासोबत होते. विशेषत: काँग्रेस पक्ष आमच्या पाठीशी उभा होता. कुस्तीमध्ये जी मेहनत घेतली, तीच मेहनत येथेही करू. आजपासून आम्ही एक नवीन इनिंग सुरू करत आहोत. अजूनही लढा सुरू आहे, असेही तिने यावेळी स्पष्ट केले.
बजरंग पुनिया यांनी पक्षात प्रवेश करताच काँग्रेसचे आभार मानले. “आम्ही भाजपकडे मदत मागितली होती, तरीही ते आम्हाला साथ देऊ शकले नाहीत, मात्र काँग्रेसने आम्हाला नेहमीच साथ दिली. विनेशच्या पराभवावर संपूर्ण देश रडत होता पण एक आयटी सेल जल्लोष करत होता, अशा शब्दांत बजरंग पुनियाने भाजपच्या आयटी सेलवर निशाणा साधला.
हेदेखील वाचा: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार सरनाईक यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त कोकणात
काँग्रेस अध्यक्षांना भेटण्यापूर्वी दोघांनीही रेल्वेची नोकरी सोडली. ही माहिती देत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “भारतीय रेल्वेची सेवा हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानास्पद काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन.”
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या दोन दिवस आधी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर आता हे दोघे काँग्रेसकडून कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली आहे.