जनरल असीम मलिक नक्की कोण आहे? पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने दिलीय NSA ची जबाबदारी
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) चे प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर लेफ्टनंट जनरल मलिक यांची करण्यात आली आहे. दरम्यान मोहम्मद असीम मलिक कोण आहेत आणि त्यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी देण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया…
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले अलोक जोशी नक्की कोण आहेत?
लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांचा लष्करी अनुभव अत्यंत समृद्ध आहे. त्यांनी बलुचिस्तान आणि दक्षिण वझीरिस्तान यांसारख्या अशांत भागांमध्ये डिव्हिजनची कमान सांभाळली आहे, जिथे दहशतवाद आणि बंडखोरी यांसारख्या गंभीर आव्हानांचा रोज सामना करावा लागतो. ISI चे प्रमुख होण्यापूर्वी ते रावळपिंडी येथील लष्कराच्या जनरल मुख्यालयात (GHQ) अॅडज्युटंट जनरल म्हणून कार्यरत होते. या पदावर त्यांनी इम्रान खान यांची अटक यांसारख्या संवेदनशील प्रकरणांवर लक्ष ठेवले होते.
या नियुक्तीकडे पाकिस्तानच्या धोरणात्मक तयारीचा एक भाग म्हणून पाहिलं जात आहे, विशेषतः अशा काळात जेव्हा नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे आणि भारताने आपल्या सशस्त्र दलांना “पूर्ण कारवाईचं स्वातंत्र्य” दिलं आहे. दुसरीकडे, पाकिस्तानकडून देखील सतत धमक्यांची भाषा वापरण्यात येत आहे. अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असीम मलिक यांची भूमिका भारत-पाकिस्तान संबंधांची दिशा आणि पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षाविषयक धोरणांवर मोठा परिणाम करू शकते, असं पाकिस्तानला वाटतं.
लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक हे सध्या पाकिस्तानच्या सर्वात प्रभावशाली लष्करी अधिकाऱ्यांमध्ये गणले जातात. ते ISI चे विद्यमान प्रमुख असून 30 सप्टेंबर 2024 रोजी ISI चे 31 वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. 30 एप्रिल 2025 रोजी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
त्यांचा लष्करी कारकिर्द तीन दशकांहून अधिक काळाची आहे. 1989 मध्ये त्यांनी 12 वी बलुच रेजिमेंटमध्ये कमिशन घेतले. आपल्या सेवाकाळात त्यांनी बलुचिस्तान आणि दक्षिण वझीरिस्तान या अत्यंत संवेदनशील आणि अशांत भागांमध्ये इन्फंट्री ब्रिगेड आणि डिव्हिजनचे नेतृत्व केले. शिवाय, त्यांनी पाकिस्तानमधील दोन प्रतिष्ठित लष्करी शैक्षणिक संस्थांमध्ये – नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी आणि कमांड अँड स्टाफ कॉलेज, क्वेटा – प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली आणि GHQ मध्ये अॅडज्युटंट जनरल म्हणून नियुक्त केलं गेलं. या पदावर त्यांनी लष्करी शिस्त, प्रशासकीय कामकाज आणि संवेदनशील प्रकरणांची देखरेख केली. त्यांनी मे 2023 मध्ये झालेल्या दंगलींच्या चौकशीची देखरेख केली आणि माजी ISI प्रमुख फैज़ हमीद यांच्या कोर्ट मार्शल प्रक्रियेचं नेतृत्व केलं.
हाफिज सईद, लश्करचं मुख्यालय, मसूदचा दहशतवादी तळ अन्…; ही मुख्य ठिकाणं भारतीय सैन्याच्या रडारवर
मंगळवारी देशाच्या प्रमुख लष्करी नेतृत्वासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं की, आता भारताची प्रतिक्रिया देण्याचा वेळ आणि पद्धत ठरवली जाणार नाही. सशस्त्र दलांना “पूर्ण परिचालन स्वातंत्र्य” देण्यात आलं आहे – म्हणजे कारवाई कधी, कुठे आणि कशी करायची याचा निर्णय आता संपूर्णपणे लष्करी नेतृत्वाच्या विवेकावर सोपवण्यात आला आहे. हा फक्त एक मुत्सद्दी संदेश नसून एक धोरणात्मक इशाराही आहे – भारत आता केवळ प्रतिक्रिया देणार नाही, तर पुढाकार घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही. भारताने स्पष्ट केलं आहे की तो दहशतवादाची मुळं उपटून टाकल्याशिवाय थांबणार नाही.