राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले आलोक जोशी नक्की कोण आहेत?
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची (NSA Board/NSAB) पुनर्रचना केली असून माजी संशोधन आणि विश्लेषण शाखा (RAW) प्रमुख आलोक जोशी यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
आलोक जोशी यांची नियुक्ती ही भारताची राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या नव्याने स्थापन झालेल्या सात सदस्यीय मंडळात सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधील अनुभवी आणि प्रतिष्ठित माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुध्ये…
एअर मार्शल पी.एम. सिन्हा – माजी वेस्टर्न एअर कमांडर
लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग – माजी दक्षिण लष्कर कमांडर
रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना – नौदलातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी
राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग – निवृत्त आयपीएस अधिकारी
बी. वेंकटेश वर्मा – माजी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी
एनएसएबी एक उच्चस्तरीय मंडळ आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) ला अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, परराष्ट्र धोरण, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आर्थिक बाबींवर सल्ला देते. या संस्थेचे सदस्य सामान्यतः प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त नागरी आणि लष्करी अधिकारी आणि सुरक्षा तज्ज्ञांमधून निवडले जातात.
आलोक जोशी कोण आहेत?
आलोक जोशी हे रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे माजी प्रमुख होते. त्यांनी १९७६ मध्ये आयपीएस हरियाणा कॅडरमध्ये सामील होण्यापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) पदवी प्राप्त केली आहे.
लखनऊचे रहिवासी असलेले हे २००५ मध्ये इंटेलिजेंस ब्युरोचे संयुक्त संचालक बनले आणि २०१० मध्ये त्यांची रॉ विशेष सचिव म्हणून नियुक्ती झाली. २०१२ मध्ये त्यांनी रॉ सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता.
आलोक जोशी यांची नियुक्ती का महत्त्वाची आहे?
आलोक जोशी यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. त्यांनी २०१२ ते २०१४ पर्यंत RAW चे प्रमुख म्हणून काम केलं आहे. २०१५ ते २०१८ पर्यंत NTRO चे अध्यक्ष होते. जोशी यांनी गुप्तचर कारवायांमध्ये, विशेषतः नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
उत्तराखंडमध्ये 6000 पोलिस, PAC च्या १७ आणि पॅरा मिलिटरीच्या 10 कंपन्या तैनात; नक्की कारण काय?
पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले, ज्यात एका नेपाळी नागरिकाचाही समावेश होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे सीमेपलीकडून येणारे दहशतवादी नेटवर्क असल्याचं मानलं जात आहे. हे लक्षात घेता, केंद्र सरकारने पाकिस्तानला कडक संदेश दिला आणि सिंधू पाणी करार स्थगित केला आहे.
हल्ल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) दोन बैठकां पार पडल्या. या बैठकांना संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सैन्यांचे प्रमुख आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. यावेळी, भारताच्या प्रतिसादाची रणनीती, वेळ आणि स्वरूप ठरवण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं.