हाफिज सईद लश्करचं मुख्यालय, मसूदचा दहशतवादी तळ अन्...; ही मुख्य ठिकाणं भारतीय सैन्याच्या रडारवर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण आहेत. भारताने दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पाकिस्तान सध्या खळबळ माजली आहे.
पाकिस्तानवर भारताकडून होणाऱ्या संभाव्य लष्करी कारवाईबाबत गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू आहेत. भारत पाकिस्तानविरोधात मोठे पाऊल उचलू शकतो आणि अशा स्थितीत भारताच्या यादीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक ठिकाणे आहेत. या यादीतील पहिले नाव म्हणजे हाफिज सईद असल्याचं मानलं जात आहे.
लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद आहे, ज्याला २००८ मधील मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मानलं जाते. संयुक्त राष्ट्राने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. असे मानले जाते की हाफिज आणि लश्करचे मुख्यालय भारताच्या निशाण्यावर आहे. लश्करचे मुख्यालय पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील मुरिदके येथे आहे.
लाहोरमध्ये हाफिज सईदच्या गुप्त ठिकाणाचा पत्ता लागल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की भारत आपल्या संभाव्य लष्करी कारवाईत हाफिज सईदच्या या ठिकाणावर हल्ला करू शकतो. हाफिज सईद आणि लश्कर भारतासाठी मोठा धोका आहेत कारण ते काश्मीर आणि इतर भागांमध्ये दहशतवादी कारवाया प्रायोजित करतात.
मसूद अझहर आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रशिक्षण तळ
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर २०१९ च्या पुलवामा हल्ल्याचा आणि इतर अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानला जातो. तो देखील संयुक्त राष्ट्रांकडून घोषित आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. असे मानले जात आहे की पाकिस्तानविरोधातील लष्करी कारवाईदरम्यान भारतीय लष्कर मसूद अझहर आणि जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळांवर हल्ला करू शकते.
जैश-ए-मोहम्मदचे प्रशिक्षण तळ प्रामुख्याने पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पंजाबमधील बहावलपूरमध्ये आहेत. पीओकेमधील रावलकोट आणि कोटली या भागांमध्ये जैशचे अनेक लॉन्च पॅड आणि प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.
जैश-ए-मोहम्मदने काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. भारताने २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकद्वारे जैशच्या एका प्रशिक्षण तळावर हल्ला केला होता. अशा तळांमुळे भारताच्या सुरक्षेला सातत्याने धोका निर्माण होत आहे.
आसिम मुनीरचे लष्करी मुख्यालय
पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल आसिम मुनीर २०२२ पासून या पदावर आहेत. पुलवामा हल्ला आणि पहलगाम हल्ल्यासारख्या दहशतवादी घटनांमध्ये त्यांचे नाव जोडले गेले आहे, कारण त्या वेळी ते आयएसआयचे प्रमुख होते. पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय रावळपिंडी येथे आहे आणि हेच ठिकाण पाकिस्तानच्या लष्करी रणनीती आणि कारवायांचे केंद्र मानले जाते.