BJP
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता लोकांच्या नजरा भाजपच्या नव्या अध्यक्षाकडे लागल्या आहेत. जे. पी. नड्डा मंत्री झाल्यापासून या सर्वोच्च पदासाठी भाजपातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. नड्डा याचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्याआधी भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता वाढली आहे. पूर्णवेळ अध्यक्ष निवडीपर्यंत कार्याध्यक्ष निवडीबाबतही भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून विचार केला जात आहे. ओबीसी, दलित आणि महिलांपर्यंत आपली पोहोच वाढवण्याबाबत भाजपा पुन्हा विचार करण्याची दाट शक्यता आहे.
आरएसएसशी सखोल संबंध असलेल्या व्यक्तीलाच या पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जे. पी. नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला. लोकसभा निवडणुकीमुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.
उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते पक्षाचे अध्यक्षपदी कायम राहतील. संघटना आणि सरकारमध्ये एकत्र काम करणाऱ्या व्यक्तीवर कोणतेही बंधन नाही, मात्र एक व्यक्ती-एक पद हे धोरण अवलंबण्याची भाजपामध्ये परंपरा आहे.