गिरीश रासकर/अहिल्यानगर: विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला भरघोस बहुमत मिळत महायुतीने राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी देत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान केले. त्यानंतर फडणवीस यांनी मंत्री मंडळात सर्वात जास्त मंत्र्यांसह विधासभा अध्यक्ष व विधानपरिषद सभापती भाजपाकडे ठेवण्यात यशस्वी ठरले. तर विधिमंडळाच्या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर फडणवीस यांनी आपल्या अत्यंत जवळचे विश्वासू शिलेदारांना शिलेदारांची वर्णी लावत विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकर तर विधानपरिषद सभापतीपदी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राध्यापक राम शिंदे यांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने नगर शहरात ना.शिंदे यांचा सर्व पक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सोहळ्याला भाजपच्या आमदारांसह मित्र पक्षाच्या आमदारांनी अक्षरशः पाठ फिरवली असल्याने एकच राजकीय चर्चांना उधाण आले. तसेच जिल्ह्यातील एकमेव मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील या कार्यक्रमाला दांडी मारल्याने भाजपातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाले आहे.
भाजपशी एकनिष्ठ असलेले शिंदे यांचा विधानसभेत पराभव होऊन देखील भाजपकडून सन्मान राखण्यात आला. शिंदे यांची विधानपरिषदेचे सभापती पदी बिनविरोध निवड झाली. यानिमिताने भाजपकडून नगरच्या भूमिपुत्राचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले. यासाठी तब्बल आठ दिवसांपासून कार्यक्रमाची तयारी सुरु होती. भाजपकडून सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यासंबंधी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. मात्र या बैठकीला देखील आघाडीच्या पदधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. यामुळे मुख्य कार्यक्रमाला सर्व आमदार मंत्री व खासदार उपस्थित राहणार का याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र या सत्कार सोहळ्याला लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बारा आमदारांपैकी केवळ एका आमदाराने उपस्थिती दर्शवली. धक्कादायक बाब म्हणजे महायुतीमधील मित्र पक्षांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. तसेच भाजपच्या आमदारांनी देखील याकडे चक्क पाठ फिरवली. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. यामुळे महायुतीमधील तसेच भाजपमधील अंतर्गत कुरघोडी पुन्हा एकदा समोर आली.
दरम्यान राम शिंदे व विखे कुटुंबामधील शीतयुद्ध हे सर्व नगर जिल्ह्याला माहीत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील उमेदवारीवरुन विखे व शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळाली. सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली मात्र लोकसभेत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा एकदा विखे व शिंदे यांच्यामधील संघर्ष समोर आला. मात्र असे असले तरी शिंदे यांचा सत्कार कार्यक्रम हा कोणा एका पक्षाचा नसून सर्वपक्षीय कार्यक्रम होता. यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी उपस्थिती देणे अपेक्षित होते मात्र असे झाल्याचे दिसले नाही. व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने सर्व पक्षीय सत्कार सोहळा हा कार्यक्रम सपशेल फेल गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील बारा आमदारांपैकी दहा आमदार हे महायुतीचे असून केवळ दोन आमदार महाविकास आघाडीचे आहेत पैकी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले हे आणि विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली परंतु राम शिंदे हे महायुतीचे असले तरी या सन्मान सोहळ्याला जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच आमदारांनी दांडी मारल्याने नेमकं यामागचे गौडबंगाल काय? याची चर्चा सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थितांमध्ये सुरू होती.