नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकची दोन बसेसना जोरदार धडक, 5 प्रवासी जखमी
उमराणे : नाशिकच्या उमराणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीजजवळ असलेल्या बसथांब्यावर प्रवाशी उतरवण्यासाठी उभ्या असलेल्या दोन बसेसना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत पाच प्रवाशी जखमी झाले असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली.
नाशिकहून मालेगावकडे जात असलेल्या (एम.एच.२९ जीसी. २७७१) व (एम.एच.१४ बीटी.३५९४) या दोन्ही बसेस उमराणे येथील बस थांब्यावर प्रवासी उतरवण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आर्मीचे ऑईल घेऊन जात असलेल्या ट्रकने या बसेसना जोरदार धडक दिली. या धडकेत चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ जे. के. अॅम्ब्युलन्सच्या साहाय्याने मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान, झालेल्या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिवहन महामंडळाच्या व्यवस्थेतील गोंधळ आणि दुर्लक्षित धोरणांचा गंभीर परिणाम असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
वारंवार होत आहेत अपघात
मालेगावकडून नाशिककडे तसेच नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या दोन्ही बस थांब्यावर तीव्र उतार असल्याने पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाहनांची व प्रवासी चढवण्यासाठी तसेच उतरवण्यासाठी उभ्या असलेल्या बसेसमध्ये धडक होऊन वारंवार अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. असे असतानाही जवळपास सर्वच बसचालक प्रवाशी उतरवण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर करत नसल्याने अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असून, संबंधित विभागाने बसचालकांना याबाबत सुचना करणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
धाण रोवणीच्या कामासाठी जाताना अपघात
दुसऱ्या एका घटनेत, धान रोवणीच्या कामासाठी मजूर घेऊन जात असलेले वाहन नियंत्रण सुटून झाडावर आदळले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मासलमेटा गावाजवळ घडला. या अपघाताने जिल्ह्यातील बेजबाबदार मजूर वाहतुकीचा प्रकार समोर आला.