पुणे : आपल्या कर्नाटकी शैलीतील व्यक्तीरेखांमुळे रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटविणारे आणि ‘बाबा चमत्कार’ या भूमिकेत लोकप्रिय झालेले नाट्य-सिने अभिनेते राघवेंद्र उर्फ अण्णा कडकोळ (Raghavendra Kadkol) यांचे आज दुपारी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ऐन उमेदीचा काळात आघाडीच्या कलाकारांच्या घोळक्यात वावरलेल्या कडकोळ यांचा अखेरचा वृद्धाश्रमातील काळ काहीसा दु:खदायी ठरला.
निर्माते-दिग्दर्शक–अभिनेते महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ आणि ‘झपाटलेला २’ या सिनेमांमधील राघवेंद्र यांनी साकारलेली बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या सिनेमात त्यांच्या जोडीला दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे आदी कलाकारही होते. याखेरीज मराठी रंगभूमीवर गाजलेल्या आणि रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील त्यांची धर्माप्पा ही ओघाओघाने आलेली भूमिकाही खूप गाजली होती.
‘धोंडी’, ‘देवदासी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आदी नाटकांमधील त्यांच्या व्यक्तिरेखांनीही रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘कुठे कुठे शोधू मी तुला’, ‘गौरी’, ‘सखी’ आदी मराठी सिनेमांच्या जोडीला कडकोळ यांनी ‘छोडो कल की बातें’ या हिंदी सिनेमातही अभिनय केला आहे.
शरद तळवलकर, काशीनाथ घाणेकर यांसारख्या दिग्गज नटांसोबत एक काळ गाजवणाऱ्या कडकोळांना शालेय जीवनापासूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा खुणावू लागली होती. याच कारणामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनही सावरकरी विचारधारेचे दर्शन घडायचे. देशाची सेवा करण्याची इच्छा असल्याने त्यांनी नौदलाच्या परीक्षा पास करून ते भारतीय आयएनएस विभागात रुजूही झाले होते. नंतर मेडिकल टेस्टमध्ये घोळ झाल्याने त्यांना नौदलातून परत यावे लागले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी विविध कामे केली. त्यात त्यांनी सरकारी खात्यात टायपिस्ट म्हणूनही काम केले. या जोडीला ते रंगभूमीवर पडद्यामागील कलाकारांना निरोप देणे, प्रयोगाच्या ठिकाणी खुर्च्या मांडणे, कलाकारांना चहा-नाश्ता देणे यांसारखी कामेही त्यांनी केली.
कलाकारांची केलेली हीच सेवा त्यांच्यासाठी पुण्याई ठरली आणि ‘करायला गेलो एक’ या नाटकाद्वारे त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर एंट्री झाली. नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना बालगंधर्व जीवन पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या नटवर्य केशवराव दाते या पुरस्कारानेही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.






