अमरावती – लोकसभा निवडणूकीमध्ये अमरावतीमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमध्ये सामील असून देखील बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये उमेदवार घोषित केला आहे. नवनीत राणा व रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये राजकीय वांदग निर्माण झालेले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना मिळालेली परवानगी रद्द करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यानंतर बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये मंगळवारी सायंकाळी बाचाबाची झाली. यानंतर बच्चू कडू यांनी दोन पाऊले मागे का घेतली याचे कारण सांगितले आहे.
पेंडॉल पेटवत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न
प्रहार संघटनेची आज अमरावतीमध्ये भव्य रॅली पार पडणार आहे. यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली आहे. बच्चू कडू म्हणाले, “आज आमच्या रॅलीला 50 ते 75 हजार लोक येतील. काल पेंडॉल पेटवत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती आमच्यापर्यंत आली. आमच्यावर काही दुसरे आरोप लावण्यात येण्यापेक्षा आणि निवडणुकीमध्ये ते आमच्यावर काहीही आरोप लावू शकतात”, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.
हिंदू आणि मुस्लिम दंगल घडू शकते
पुढे बच्चू कडू म्हणाले, “मला अजूनही भिती आहे की, २६ तारखेला किंवा उद्या-परवा हिंदू आणि मुस्लिम दंगल घडू शकते, अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे आम्ही दोन पावलं मागे घेतली. अन्यथा रात्रीच या ठिकाणी आमचे 20 ते 25 हजार कार्यकर्ते आले असते. मात्र, कोणताही डाग लागू नये, म्हणून आम्ही दोन पावलं शांततेने मागे घेतली. कायदा गृहमंत्र्यांनी तोडला आहे. त्यांनी या ठिकाणी सभा घ्यायला नव्हती पाहिजे. आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर पुन्हा आम्हाला परवानगी नाकारली आणि त्यांना दिली. ही घटना निषेधार्थ आहे,” असा आरोप बच्चू कडू यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.