
मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा 'हात'; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक
मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. शुक्रवारी काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर केले की, ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत १४३ जागा लढवतील तर वंचित बहुजन आघाडीला ४६ जागा सोडण्यात आल्या आहे. याबाबतची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.
सचिन सावंत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने आता काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या ताब्यात असलेल्या पाच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. युतीसाठी हा निर्णय काहीसा गैरसोयीचा असला तरी जागावाटपात मागण्यांचा आदर केला आहे. आम्ही या पाच जागांव्यतिरिक्त इतर सर्व जागा एकत्र लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाच जागांपैकी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) एका जागेवर, राष्ट्रीय समाज पक्ष (आरएसपी) दुसऱ्या जागेवर निवडणूक लढवत आहे. तर उर्वरित तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहे.
दरम्यान, काँग्रेसने यापूर्वी १५० जागा आणि वंचित बहुजन आघाडीने ६२ जागा लढवण्याची घोषणा केली होती. परंतु, उमेदवारांच्या कमतरतेमुळे सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्यात दोन्ही पक्षाला अपयश आले.
नांदेडमध्ये युती फिस्कटली अन् आघाडी जुळली
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली असताना दुसरीकडे काँग्रेसने मतांचे विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. यामध्ये ६१ जागा लढवत २० जागा वंचित आघाडीला देण्याचा निर्णय घेतला आहे. युती फिस्कटली… आघाडी जुळली… असे राजकीय चित्र मंगळवारी नांदेडात दिसून आले.
अहिल्यानगर येथे दोन उमेदवार बिनविरोध
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याच दिवशी एकूण २८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात ४७७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. अर्ज माघार घेण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे. प्रभाग ८-ड मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे यांच्या विरोधात एकही अर्ज शिल्लक न राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
हेदेखील वाचा : Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण