बारामती: संतोष देशमुख यांच्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती शहरात कडकडीत बंद पाळून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती शहरातून सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच धनंजय मुंडे यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना या खटल्यात सहआरोपी करावे, तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.या आंदोलनात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख व बंधू धनंजय देशमुख हे देखील सहभागी झाले होते. वैभवीच्या भाषणाने उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले.
मस्साजोग (जि. बीड) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती बंदचे आवाहन करून शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. बारामती शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवरायांच्या पुतळ्याला संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ झाला. गुणवडी चौक, मारवाड पेठ, स्टेशन रोड , भिगवन चौक या मार्गे मोर्चा बारामती शहरातील तीन हत्ती चौक या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली.
दरम्यान या मोर्चात संतोष देशमुख अमर रहे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा घ्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी, कन्या वैभवी व बंधू धनंजय देशमुख यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनीसह , महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
निषेध सभेमध्ये बोलताना धनंजय देशमुख यांनी माझे बंधू असलेल्या संतोष देशमुख या निष्पाप माणसाला मारण्यात आले आहे, त्यामुळे आपल्याला न्याय घ्यायचा का? असा सवाल उपस्थितांना करून ते म्हणाले, आपण फक्त न्याय मागणारे आहोत, न्याय देणारे न्याय देणारे सरकार आहे. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न भयंकर आहे. या घटनेची सुरुवात २८ मे २०२४ रोजी झाली होती, त्यावेळी अवादा कंपनीच्या मॅनेजरसह इतर दोन अधिकाऱ्यांचे अपहरण काळया स्कार्पियोतून करण्यात आले होते. त्यावेळी दुसऱ्या दिवशी कंपनीने दिलेल्या तक्रारीमध्ये फक्त एकाच व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या सर्व प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड असल्याने त्याने दिलेल्या आदेशानुसार २९ नोव्हेंबर २०२४ रोजी या कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी आरोपी आले होते. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याना तसेच सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अशोक सोनवणे या दलित तरुणाला मारहाण करण्यात आली, ही माहिती संतोष देशमुख यांना समजल्यानंतर ते त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी आरोपींना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांना क्रूर पद्धतीने मारण्यात आले. मारहाणीचे फोटो व व्हिडिओ आपण पाहू शकणार नाही, इतक्या क्रूर पद्धतीने त्यांना मारण्यात आले.
बीड जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे. याकडे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय हस्तक्षेप देखील करण्यात आला, त्याचे पुरावे माझ्याकडे असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ते पुरावे आपण सादर करणार आहोत. या घटनेनंतर मला व माझ्या कुटुंबाला मराठा बांधवांसह 18 पगड जाती धर्मातील लोकांनी सावरण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्राला शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच वारसा आहे. त्यामुळे न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
वैभवी देशमुख हिने आपल्या भाषणात माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता? असा सवाल करून ती म्हणाली, ज्या खंडणीसाठी आरोपी गावात आले होते, ती खंडणी कोणासाठी जाणार होती? एका दलित बांधवाला वाचवण्यासाठी माझे वडील गेल्यानंतर त्यांना क्रूर पद्धतीने मारले, त्यामुळे कोणाला मदत करण्यासाठी जर कोणी जात असेल तर या घटनेमुळे दुसऱ्याला मदत करण्यासाठी कोणी जाईल का? असा सवाल वैभवी ने उपस्थित केला. माझ्या वडिलांचे हात जरी यांनी तोडले असले तरी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील जनतेने आम्हा कुटुंबाला मदतीचे हात दिले, त्यामुळे न्यायाचा लढा पुढे आला.
आमच्याकडे बीड जिल्ह्यातील भयानक परिस्थितीचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. त्या ठिकाणी प्रशासन फिर्याद देणाऱ्याचे न ऐकता आरोपीचे ऐकून कोणावरती गुन्हा दाखल करायचा, हे ठरवते, असा आरोप देखील वैभवी ने केला. या मोर्चात लहान लेकरं देखील आमच्यासोबत चालत होती, त्यामुळे प्रशासनाला जाग कधी येणार? असा सवाल यावेळी तिने व्यक्त केला. दरम्यान यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आले. यावेळी संस्कृती ज्ञानेश्वर जगताप व नेहा राहुल गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. निवेदनाचे वाचन अक्षता निकम हिने केले.या मोर्चाला विविध सामाजिक संघटनांनी तसेच सर्वधर्मीयांनी पाठिंबा व्यक्त करून या मोर्चात सहभाग नोंदवला. शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार व त्यांचे चिरंजीव, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार हे देखील मोर्चात सहभागी झाले होते.