''बांग्लादेशमध्ये जे घडत आहे त्यावरून आपल्यासाठी स्वातंत्र्य किती...''; स्वातंत्र्यदिनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे भाष्य
आज आपला भारत देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आज देशभरात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान स्वातंत्र्यदिनानिमित्त सुप्रीम कोर्टात देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी कार्य्रक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी बांग्लादेश हिंसा, स्वातंत्र्य अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
सुप्रीम कोर्टातील स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, ”आज बांग्लादेशमध्ये जे घडत आहे, त्यावरून आपल्यासाठी स्वातंत्र्य किती महत्वाचे आहे हे समजते आहे. २४ वर्षांच्या अनुभवावरून न्यायधीश म्हणून मी सांगू इच्छितो की, न्यायालयांचे काम सामान्य भारतीयांच्या संघर्षाचे प्रतिबिंब अधोरेखित करते. ग्रामीण भाग आणि शहरांतून मोठ्या प्रमाणात नागरिक सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी येत असतात.”
देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर झेंडावंदन केले. तसेच लाल किल्ल्यावरून देशवासियांना मोदींनी संबोधित देखील केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायद्याचा उल्लेख केला होता. देशात एक सेक्युलर सिव्हिल कोड असणे आवश्यक आहे. यामुळे देशात धर्माच्या आधारावर जो भेदभाव केला जात आहे, तो संपुष्टात येईल. सुप्रीम कोर्टाने देखील अनेकदा युसीसीवर चर्चा केली आहे, असे मोदी म्हणाले.
समान नागरी कायद्याचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे सर्वांसाठी सारखे नियम असणे. मात्र आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. जिथे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचे स्वातंत्र्य आहे. तिथे हा कायदा लागू करणे शक्य आहे का? किंवा लागू केल्यास त्याचा काय परिणाम होणार याचा विचार करावा लागणार आहे. जर का देशात समान नागरी कायदा लागू झाला तर देशभरात सर्वांसाठी विवाह,घटस्फोट, वारसा व दत्तक यांच्यासाठी सर्व धार्मिक समुदायांसाठी समान नियम लागू होतील.