निलंगा : निलंगा तालुक्यात वाळू माफियाची मुजोरी वाढली असून, वाळू माफियाविरुद्ध जोरदार मोहिम निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सुरु केली. तहसीलदार यांनी वाळू माफियांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी विविध पथके स्थापन केली असून, सदर पथके दिवसरात्र फिरुन अवैध उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कार्यवाही करत आहेत. अशाच एका प्रकरणी होसूर ते चिचोंडी रोडवर खंडू उत्तम शामगीरे हे ट्रॅक्टरव्दारे अवैध वाहतूक करत असताना चौकशी केली.
तसेच होसूर सज्जाचे तलाठी कांबळे राजू पुंडलिकराव यांना या ट्रॅक्टरद्वारे अवैध माती मिश्रित वाळूची वाहतूक करताना आढळून आल्यामुळे त्यांनी हा ट्रॅक्टर तहसील कार्यालय निलंगा येथे लावण्यास सांगितला असता ट्रॅक्टर मालक खंडू उत्तम शामगीरे (रा. चिचोंडी) यांनी या तलाठ्यास शिवीगाळ करुन व जीवे मरण्याची धमकी देऊन वाळू खाली टाकून पळून गेला आहे. त्यामुळे तलाठी कांबळे यांनी संबंधितांवर औराद पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात कासारशिरसी (ता. निलंगा) येथे अवैध वाळू टाकून उभ्या असलेल्या टिप्परची चौकशीत परवाना नसल्याचे समोर आले असून, त्यावर कारवाई करण्यात आली.