दीपक केसरकर यांची बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया
बदलापूर : बदलापूरामध्ये सध्या वातावरण तापले आहे. चिमुरड्या 4 वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये अत्याचार झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे. 12 तास उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांनी कारवाई न केल्याने देखील टीकास्त्र डागले जात आहे. बदलापूर शहर बंद पुकारण्यात येत असून संबंधित मुलींच्या शाळेवर देखील लोकांनी हल्लाबोल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. या अत्याचार प्रकरणावर आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर प्रतिक्रिया दिली आहे.
विशाखा समिती स्थापन करणार
दीपक केसरकर यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणावर दीपक केसरकर यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात असून संवेदनशीलपणे प्रकरण हातळले जात आहे. पुढे केसरकार म्हणाले, “बदलापूरमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. यानंतर आम्ही शिक्षण आयुक्त, सचिव, अधिकारी यांच्यासह तातडीने बैठक बोलावली. सात महिन्यापूर्वीच आम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री अंतर्गत शाळांमध्ये समिती स्थापन करण्याचे सांगितले आहे. मात्र आदेशानंतर देखील शाळांमध्ये समिती स्थापन झाली नसेल आणि विद्यार्थींनीवर परिमाण होणार असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असे प्रसंग परत घडू नये यासाठी मुलींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येईल. तसेच प्रत्येक शाळेत तक्रार पेटी ठेवणे बंधनकारक असल्याचा आम्ही जीआर काढत आहोत. तसेच ऑफिसमध्ये विशाखा समिती असते त्याप्रमाणे शाळांमध्ये देखील स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
शाळेवर कारवाई
पुढे केसरकर म्हणाले, “बदलापूरला झालेला प्रकार अतिशय दुःखद आहे. अशी परिस्थिती कोणत्याही मुलीवर यायला नको. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माझ्यासोबत फोनवर चर्चा केली. ही घटना ज्या शाळेमध्ये घडली. त्या शाळेला आम्ही नोटीस बजावली आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले तसेच शिक्षिकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक ठेवले आहे. शाळेत सीसीटीव्ही असून बंद होता, ही शाळेची जबाबदारी होती. तसेच अक्षय रामा शिंदे नावाचा गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्सो अंतर्गत 74, 75 आणि 76 अंतरर्गत गुन्हा दाखल, तसेच फास्ट ट्रेकवर ही केस चालवण्याची विनंती करेल. तसेच 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये गुन्हेगाराला शिक्षेला प्रयत्न करेल,” असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले आहे.
गृहमंत्र्यांकडे प्रयत्न करणार
पुढे ते म्हणाले, “घडलेली घटना मोठी आहे. शाळेमध्ये अशा घटना घडेल असा कोणी विचार केला नव्हता. या प्रकरणामध्ये त्या परिसरातील पोलीस स्टेशन येथील पीआय यांनी घेतलेला निर्णय असंवेदनशील आहे. पालकांनी तक्रार केल्यानंतर 12 तास नंतर देखील कारवाई केली नाही, हे गंभीर आहे. त्यांची गृह मंत्रालयाकडून बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांची फक्त बदली पूरेशी नाही. त्यांना निलंबित केलं पाहिजे. या प्रकरणी त्यांनी वरिष्ठांशी तसेच मंत्रिमंडळातील लोकांना सांगणे गरजेचे होते. मात्र हे प्रकरण त्यांनी स्वतः पर्यंत ठेवलं. त्यामुळे त्यांची फक्त बदली नाही तर त्यांना निलंबित केलं पाहिजे. यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे,” असे मत दीपक केसरकर यांनी मांडले.