
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास काही दिवसांपूर्वीच मान्यता देण्यात आली होती. या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. १ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु.१.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रु.१०.०० लक्ष व कायमस्वरुपी अंपगत्त्व आल्यास रु.५.०० लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
आशा सेविका गटप्रवर्तकांची राज्यातील संख्या
सध्या राज्यात ७५ हजार ५७८ आशा स्वयंसेविका आणि ३६२२ गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात. हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
आशा सेविका
आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत “आशा स्वयंसेविका योजना” राबविण्यात येत आहे. आशा सेविका ही गावातील स्थानिक रहिवासी असल्याने व तिला स्थानिक भाषा अवगत असल्याने गावाच्या आरोग्य विषयक अडचणी समजून घेण्यास व नेतृत्व करुन गावपातळीवरील समस्या सोडविण्याकरिता आशा स्वयंसेविकेकडून महत्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्यातील १५ आदिवासी जिल्हे व ३१ बिगर आदिवासी जिल्ह्यांत आशा स्वयंसेविका कार्य करते. आशासेविकांना शासन मानधन देते.