सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. नवीन बँक पुस्तक काढणे, केवायसी करणे आणि खात्यात पैसेही जमा झाले की, हे पाण्यासाठी जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना पाटसच्या महाराष्ट्र बँकेत पिळवणूक केली जाते. कर्मचाऱ्याकडून अरेरावीची भाषा वापरली जाते. आठ आठ दिवस हेलपाटे मारायला लावले जातात. अक्षरशः या बँकेत महिलांशी हेळसांड केल्याचे प्रकार घडत आहेत. अशा तक्रारी आता महिला खातेदार करू लागल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेला राज्यातील ग्रामीण भागातील मोठा प्रतिसाद मिळाला. लाखो महिलांनी संबंधित कार्यालयात हेलपाटे आणि धावपळ करत कागदांची जुळावाजुळव केली. बँकेत नवीन खाते काढण्यासाठी रांगेत दिवसभर उभे राहून हेलपाटे मारले. अर्ज भरले ते अर्ज अनेक महिलांचे मंजूरही झाले. मग लाभार्थी महिलांचे बँकेत पैसे जमा झालेत का नाही याची महिती घेवून पैसे काढण्यासाठी गर्दी होऊ लागली. पाटसच्या महाराष्ट्र बँकेत लाभार्थी महिला पैसे जमा झालेत का नाही, त्याची खात्री करण्यासाठी महिला बँकेत गर्दी करू लागल्या. रांगेत उभे राहून नंबर आला तर कर्मचारी सांगायचे तुमची केवायसी झाली नाही, करून घ्या. आधार कार्ड लिंक करून घ्या, केवायसी करण्यासाठी बाहेर जाऊन ते स्क्रॅन करून आणा, परत तुमची कागदे नाहीत. आमच्याकडे केवायसीचा फार्म नाही, अशा प्रकाराने महिला वैतागल्या आहेत. बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोरीपणामुळे लाडक्या बहिणींना मोठा त्रासाला झाला समोर जावे लागले. महाराष्ट्र बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणाचं नियंत्रण नाही. त्यामुळे ते महिला खातेदारांना व्यवस्थित वागणूक देत नसल्याने प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
खाते काढा, नाहीतर बंद करा
तुम्हाला आमच्या बँकेत खाते काढायचे असेल तर काढा, नाहीतर खाते बंद करून टाका, अशी भाषा बँकेतील कर्मचारी वापरत आहेत. वास्तविक पाहता बँकेचा केवायसी फार्म भरून खातेदारांकडून घेणे आणि त्याची पुढील कार्यवाही करणं हे बँकेच्या कर्मचाऱ्यांचे काम आहे. मात्र ही सगळी कामे ते खातेदारांनाच बाहेर खासगी व्यक्तिंकडून करून आणण्यास सांगत आहेत. त्यासाठी महिलांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला. अनेकांना नवीन खाते पुस्तक दिले गेले नाही. परिणामी त्यांना पैसे खात्यावर असूनही काढता आले नाही.
सन्मानची वागणूक द्यावी
बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिला खातेदार किंवा इतर खातेदारांना सन्मानाची वागणूक द्यावी, व्यवस्थित बोलावे, अशी अपेक्षा खातेदारांची आहे. बँकेचे शाखा अधिकारी प्रतीक गुप्ता यांना विचारले असता, त्यांनी यावर अधिक बोलणं टाळले. महाराष्ट्र बँकेत फक्त एक अधिकारी आणि एक कर्मचारी आहे, असे उत्तर दिले.