
Suhas Babar: खानापूरमध्ये विरोधकांचे पानिपत; बाबर यांचे वर्चस्व कायम, तब्बल 'इतक्या' मतांनी जिंकली जागा
विटा/दीपक पवार: खानापूर विधानसभा मतदारसंघ २०२४ ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. ते कारण असे की, महायुतीचे सुहास बाबर यांंना मिळालेल्या मताधिक्याने मतदारसंघात नवा विक्रम प्रस्थापित केला. सुहास बाबर यांना तब्बल ७८ हजार १७७ मते मिळाली. ‘मविआ’चे वैभव पाटील व राजेंद्र देशमुख यांचे पानिपत झाले. बाबर यांनी घेतलेले मताधिक्य पाटील – देशमुख यांना आत्मचिंतन करायला लावणारे ठरले. बाबर हे राजकारणात घेऊ पाहणाऱ्यांचे आयडाॅल ठरले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सुहास बाबर यांना उमेदवारी दिली. आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर मतदारसंघात सुहास बाबर यांना असणारी सहानुभूती, स्व. अनिल बाबर यांनी केलेली टेंभू योजनेचे कामे, सुहास बाबर यांनी अनिल बाबर यांच्या पश्चात विटा शहरात पाणीपुरवठा योजनेसाठी ८७ कोटींचा आणलेला निधी, त्याचबरोबर मतदारसंघातील सर्वांगिण विकासासाठी १३५० कोटींचा आणलेल्या निधीतून मतदारसंघातील विकासाला दिलेली चालना, ही त्यांची जमेची बाजू ठरली. या निवडणूकीत त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे ‘खानापूर’चा किल्ला सर केला.
निवडणुकीत दिसुन आला लाडक्या बहिणींचा प्रभाव
सुहास बाबर यांच्यामागे आटपाडीचे तानाजी पाटील व विट्यातून मनमंदीरचे अशोक गायकवाड, धर्मेश पाटील, सुशांत देवकर यांच्यासह ज्ञातअज्ञात कार्यकर्त्यांनी ताकद उभा केली. शिवाय मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सभा घेऊन बाबर यांना ताकद दिली. शिवाय या मतदारसंघात ९० हजारांच्या आसपास लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या बहिणी आहेत. त्याचा प्रभाव निवडणूकीत प्रामुख्याने दिसून आला. पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाती घेतली. मात्र मतदारांना ते पसंत पडले नाही, हे मतपेटीतून दिसून आले.
हेही वाचा: …आधी स्वतःचा इतिहास तपासा; सुहास बाबर यांची वैभव पाटलांवर अप्रत्यक्ष टीका
खानापूर व विसापूर भागात देशमुख यांचा जनसंपर्काचा अभाव
वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, डॉ. विश्वजित कदम यांच्या सभा झाल्या, मात्र त्यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. याशिवाय पाटील यांचा मतदारसंघात जनसंपर्काचा असलेला अभाव, गमावलेला विश्वास, जुन्या – नव्या कार्यकर्ते, नेत्यांचा नसलेला ताळमेळ पाटील यांच्या पराभवला कारणीभूत ठरला. राजेंद्र देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर केली. देशमुख कुटुंबियांमध्ये एकवाक्यता नसल्याचे सुरवातीला दिसून आले. खानापूर व विसापूर भागामध्ये जनसंपर्काचा त्यांचा अभाव प्रामुख्याने दिसून आला. आटपाडी तालुक्याची अस्मिता हा मुद्दा घेऊन ते निवडणूकीला सामोरे गेले. परंतु मतदारांनी त्यांना धुडकावले. एकंदरीत या निवडणूकीत पुन्हा एकदा खानापूर विधानसभा मतदारसंघात बाबरांची पकड मजबूत झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा: अनिल बाबर खलनायक नव्हे नायक : सुहास बाबर
शंभूराज देसाई यांचा शब्द खरा
खानापूर विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीने जिंकायची, यासाठी वैभव पाटील यांना ऐनवेळेला निवडणूक रिंगणात उतरवले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आदेश दिले. परंतु कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवत सुहास बाबर यांच्या पाठीशी राहून मोठ्या मताधिक्यांनी त्यांना निवडून आणले. सुहास बाबर यांचा दाखल करण्यासाठी पाटणचे आमदार शंभूराज देसाई आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देसाई म्हणाले होते, सुहास बाबर हे शंभर टक्के निवडून येणार आहेत. निवडून आल्यानंतर त्यांना घेऊन मी कराडमार्गे मुंबई जाणार आहेत. देसाई यांचा शब्द खरा झाला.