विटा : आम्ही कोठेही अंधारात पळून गेलेलो नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या गटनेत्यासोबत आहोत. गद्दारीचा इतिहास कुणाचा आहे, हे मतदारसंघाला माहीत आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करून स्वतःचे हसे करून घेऊ नका, अशी टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर (Suhas Babar) यांनी वैभव पाटील (Vaibhav Patil) यांचे नाव न घेता केली.
सुहास बाबर म्हणाले, आम्ही ज्या-ज्या वेळेस पक्ष बदलला त्या वेळेस पक्षनेतृत्वाला याची पुरेपूर कल्पना दिलेली आहे. ज्या-ज्या वेळेस पक्ष बदलून आम्ही जनतेसमोर गेलो, त्या-त्या वेळेस जनतेने आमची भूमिका स्वीकारून आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलेले आहे. आम्हाला मते न देणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अनिलभाऊ यांच्या एका पत्रावर सहाव्या टप्प्यासाठी मंजुरी दिली होती.
वंचित गावांचा टेंभूत समावेश केला होता. तर हा सहावा टप्पा कशासाठी रखडला? हा आमचा सवाल आहे. तुम्हाला याचे उत्तर वंचित गावांना द्यावे लागेल. अन्यथा ही गावे तुम्हाला फिरू देणार नाहीत. आम्ही एकटे कधीच टेंभूचे श्रेय घेत नाही. पण सर्वांपेक्षा काकणभर प्रयत्न आम्ही केलेले आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.






