'महाराष्ट्राची वाताहात करणार्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना आहे', नाना पटोले यांचा घणाघात
महाराष्ट्राची वाताहात करणार्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना आहे. त्या अधिकाराचा त्यांनी या निवडणुकीत परिपूर्ण वापर करावा असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पनवेल येथील प्रचार सभेत भाजपा आणि मित्र पक्षांवर घणाघाती प्रहार केले. महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
रमेश कीर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांमध्ये गेली बारा वर्षे कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये आमदाराचे अस्तित्व जाणवत नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की विद्यमान आमदार यांनी प्रसिद्ध केलेल्या 20 पानी पत्रकात पदवीधर आमदाराने करावयाचे एकही काम समाविष्ट नाही. त्यांनी विद्यमान आमदारांना आव्हान दिले की बारा वर्षात बारा सोडा,फक्त तीन केलेली कामे दाखवा.
रोजगार निर्मितीवर भर, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासाठी आमचा अग्रक्रम असेल तसेच जिल्हा उद्योग केंद्रांना भेटी देऊन उपलब्ध रोजगारांची माहिती घेऊन ती बेरोजगारांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही सातत्याने करू. मोजकेच मुद्दे घेऊन कमी बोलून जास्त काम करण्यावर आमचा भर असेल. सभेच्या अध्यक्षस्थानी असणारे नानाभाऊ पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील असंविधानिक सरकार यांचा खरपूस समाचार घेताना सांगितले की सध्या बेरोजगारांचे राज्य अशी आपली ओळख निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षात केंद्रातील सरकाराने महाराष्ट्राची वाताहत लावली आहे. आज 17 हजार पोलिसांची भरती होत असली तरी त्यासाठी 17 लाख अर्ज आले आहेत यावरून बेरोजगारीची कल्पना येते. ही पोलीस भरती देखील शाश्वत नाही, उद्या कदाचित पेपर फुटू शकतो आणि भरती प्रक्रिया थांबू शकते.
आज इथे एखादा प्रकल्प येत असेल तर त्यासाठी लागणार्या मनुष्यबळाची अगोदरच पडताळणी करून त्या स्वरूप त्या प्रकल्पामध्ये रोजगार निर्माण करून देण्याचे काम आम्हाला उभे करायचे होते. परंतु कोरोना कालखंड आणि पक्षांची तोड फोड करून बनविलेले असंविधानिक सरकार हे आपल्या समोरील अडथळा ठरले. विधान परिषदेच्या या निवडणुकांच्या माध्यमातून परिस्थिती बदलण्याची सुवर्णसंधी आपल्याला चालून आलेली आहे. आज महागडी वीज तुम्हा आम्हाला वापरावी लागत आहे. उपभोक्त्यांना सतावणारी प्रीपेड रिचार्ज मीटर आपल्या डोक्यावर आणून मारली जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमची लढाई या सगळ्याच्या विरोधात आहे. कारण अशा वातावरणामुळेच महाराष्ट्रातील उद्योगधंदे अन्य राज्यात जात असल्यामुळे पदवीधरांसह सगळ्यांनाच बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. आज गोदी मीडियाला हाताशी धरून नरेटिव पसरवण्याचे धंदे सुरू आहेत. माझे पाय धुण्याच्या बातमीवरून विपर्यास करून पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थी करत असलेले आंदोलन दडपण्याचा कारभार सुरू आहे. या गोदी मीडियाला माझ्या पायाला लागलेला चिखल दिसला पण ई डी आणि सीबीआय सारख्या चिखलांनी बरबाटलेला महाराष्ट्र यांना दिसत नाही, ही खरी शोकांतिका आहे.
कोकणात रमेश कीर यांचा तर अन्य तीन ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवाराचाच दणदणीत विजय होणार. माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, पनवेल शहर काँग्रेस कमिटी महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, शेकापूर पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी,समाजवादी पार्टी चे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक,मल्लिनाथ गायकवाड,अवचित राऊत युवासेना महाराष्ट्र सहसचिव, आदींचे सह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.






