सातारा : सातारा जिल्ह्यातील हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या माल वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो वाहनातून डिझेल चोरी करणारी नवी मुंबईची चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी करण जगदिश निर्मल, (वय २९, रा. गणेश सोसायटी, जुगाव वाशी सेक्टर नंबर ११ नवी मुंबई), राशिद जावेद खान, (वय २८, रा. पितांबर अपार्टमेंट, जुगाव वाशी सेक्टर नंबर ११ नवी मुंबई), धिरज नरेंद्र वर्मा, (वय २२, रा. कोपरखेरणा, बोनकोवडे, सेक्टर नंबर १२ नवी मुंबई), समीम साहेबमियाँ हुसेन, (वय १९, रा. ५०९ दाखिलभाई बालकृष्ण पाटील नेरूळ गाव राममंदिर जवळ नवी मुंबई) अशी याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
त्यांच्याकडून डिझेल चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन, चोरी केले डिझेल, मोबाईल हॅन्डसेट असा मिळून एकूण ४ लाख ५१ हजार ५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या मोठया वाहनांमधील हजारो रुपयांच्या डिझेल चोरी करण्याचे प्रकार वाढले होते. या अनुषंगाने तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन चोरट्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.
दि. ९ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना विश्वसनीय गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पाचवड गावच्या हद्दीत पुणे ते सातारा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चे सर्व्हिस रोडवर मारुती सुझुकी स्विफ्ट (क्र. एम. एच. ४३. ए. एन. ७७९१) मधून काही इसम महामार्गावर जाणाऱ्या वाहनांना थांबवून डिझेल खरेदी करावयाचे आहे काय? असे विचारत आहे. त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्यांच्या विशेष पथकास कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
तपास पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी धडक मारली त्यावेळी एक वाहन व ४ व्यक्तींना याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मिळून आलेल्या डिझेलच्या कॅनबाबत विचारपूस केली असता त्यांनी कॅनमधील डिझेल त्यांनी भुईंज गावच्या हद्दीतील प्रतापगड ढाव्याचे समोर उभ्या असलेल्या टेम्पोमधून चोरी करुन विक्रीसाठी आणले असल्याचे सांगितले. तसेच त्यांना आणखी विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी २ महिन्यापुर्वी शिरवळ येथून उभ्या असलेल्या डंपरमधून देखील डिझेल चोरी केले असल्याचे सांगितले. याबाबत भुईंज पोलीस व शिरवळ पोलीस ठाणे येथे दाखल असलेले दोन डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सचिन साळूंखे, सनी आवटे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, सचिन ससाणे, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला होता.