Pakistan's Defense Minister Khawaja Asif on Pahalgam attack We’re not involved
इस्लामाबाद : जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही”, तसेच भारतातच लोक सरकारविरोधात उठले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
ख्वाजा आसिफ यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले, “आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. आम्ही कोणत्याही स्वरूपाच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही. पहलगाम हल्ल्यामागे आमचा हात असल्याचा आरोप पूर्णतः निराधार आहे.” मात्र, त्याचबरोबर त्यांनी वादग्रस्त विधान करत, भारतातील अंतर्गत स्थितीवर टीका केली. “भारताचे सध्याचे सरकार अल्पसंख्याकांवर अन्याय करत आहे. बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाविरोधात हिंसाचार वाढला आहे. त्यामुळे देशातील नागरिक उठाव करत आहेत,” असे त्यांनी म्हटले.
We have absolutely nothing to do with it. We reject terrorism in all its forms and everywhere, says Pakistan’s Defence Minister Khawaja Asif on the #Pahalgam attack.#pahalgamattack pic.twitter.com/qGiTz6uVOn
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) April 23, 2025
credit : social media
मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २६ जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळच्या दोन परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांच्या वाहनांच्या ताफ्यावर अचानक गोळीबार केला. या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. ही बैठक सौदी अरेबियाहून पंतप्रधान परतल्यानंतर थेट विमानतळावरच घेण्यात आली, हे विशेष.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रावलकोटमध्ये रचला गेला होता पहलगाम हल्ल्याचा कट? ‘लष्कर-ए-तोयबाची’ उघड धमकी आणि भारताविरोधातील कटाचे नवे पुरावे
भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा संशय आहे. मात्र, ख्वाजा आसिफ यांनी या आरोपांना उलटवून भारतातच अस्थिरता असल्याचे चित्र रंगवले. “नागालँड, मणिपूर आणि काश्मीरमध्ये जनता सरकारविरोधात उभी राहिली आहे. लोक आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत.” असे ते म्हणाले. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे जबाबदारी नाकारण्याचे आणि भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर दोष टाकण्याचे धोरण पाळले जात आहे. तथापि, भारताने जागतिक पातळीवर या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर दबाव आणण्याचे संकेत दिले आहेत.
या हल्ल्यानंतर भारताने पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. याशिवाय, काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : J&K attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याने जग हादरले, 26 निष्पापांचा मृत्यू, आंतरराष्ट्रीय निषेध
पहलगाममध्ये झालेला हल्ला फक्त काश्मीरपुरता मर्यादित न राहता, तो भारत-पाकिस्तान संबंधांवर पुन्हा एकदा सावली टाकणारा ठरतोय. पाकिस्तानकडून जबाबदारी नाकारणे आणि भारतातच असंतोष असल्याचे चित्र उभे करणे ही जुनी पद्धत असली, तरी यावेळी जागतिक समुदाय काय भूमिका घेतो याकडे लक्ष लागले आहे. भारताने मात्र स्पष्ट केलं आहे. “दहशतवाद्यांवर कारवाई हीच खरी प्रत्युत्तराची भाषा आहे.”