जैन धर्म हा भारतातील सर्वांत प्राचीन धर्मांपैकी एक आहे. जैन धर्म पूर्णपणे त्याग, संयम आणि कठीण तपश्चर्येवर आधारित आहे. धर्मात काही साधना केल्या जातात त्यातील एक म्हणजे पर्युषण पर्व. हा जैन धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. जैन धर्मीय साधकांसाठी आत्मशुद्धी, तप, संयम आणि आत्मपरीक्षणाचा हा काळ असतो. “पर्युषण” या शब्दाचा अर्थ “स्वतःमध्ये राहणे”, म्हणजेच इंद्रियांच्या विषयांपासून दूर राहून आत्म्यात रमणे. या काळात साधक आपला आहार, आचरण आणि विचारांवर नियंत्रण ठेवतात.
या काळात जैन साधक आपले जीवन तप, संयम, उपवास आणि क्षमेद्वारे शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात.श्वेतांबर जैन समाजात हा उत्सव आठ दिवस चालतो, तर दिगंबर जैन समाजात तो दहा दिवस म्हणजे दशलक्षण पर्व म्हणून साजरा केला जातो. या दिवसांत धार्मिक ग्रंथांचे वाचन, साधु-साध्वींची प्रवचने ऐकणे, पूजा, पाठ आणि प्रतिक्रमण (आत्मपरीक्षण) यावर विशेष भर दिला जातो.अनेक जैन भक्त उपवास पाळतात. काहीजण फक्त उकळलेले पाणी घेतात, तर काही अल्पोपवास करतात. उपवासाचा उद्देश शरीराला वश करून आत्मशुद्धी साधणे हा असतो. आत्म्याचे शुद्धीकरण मोह, काम, क्रोध आणि मत्सर यातून मुक्ती मिळवणे हे या पर्वामागील मूळ तत्त्व आहे.
या जैन धर्मातील पर्युषण पर्वाला कालपासून सुरुवात झालेली आहे. जैन धर्मात पर्युषण हा सणांचा राजा मानला जातो.या काळात, जैन बांधव आपल्या आत्मनिरीक्षणावर भर देतात. जैन धर्म पूर्णपणे त्याग, संयम आणि कठोर तपश्चर्येवर आधारित आहे आणि त्या कठोर तपश्चर्येचा एक भाग म्हणजे ‘केशलोचन’.
जैन धर्मात, जेव्हा साधु किंवा साध्वी दीक्षा घेतात तेव्हा ते सांसारिक जीवन सोडून भिक्षूचे जीवन सुरू करतात.या काळात, ते स्वतःच्या हातांनी केशवपन करतात. या प्रक्रियेला केशलोचन म्हणतात.जैन साधना पद्धतीचा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण तो त्याग आणि अलिप्ततेचे प्रतीक मानला जातो. ही प्रक्रिया वर्षातून एकदा किंवा दोनदा केली जाते, जी अत्यंत अनिवार्य आहे.
साधकाची आपल्या गुरु किंवा आचार्यांच्या साक्षीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पाडते. साधक जेव्हा संन्यास जीवन स्वीकारतो, तेव्हा तो सर्व सांसारिक मोह, बंधनं व अहंकार त्यागतो. याच वेळी केशलोचनाची प्रक्रिया केली जाते.केस हे सौंदर्य, आसक्ती व देहाभिमानाचे प्रतीक मानले जातात. केस कापणं म्हणजे देहाबद्दलची आसक्ती व अभिमान पूर्णपणे सोडणे. महिलांसाठी केस जिव्हाळ्याचा भाग असतो. मात्र महिला साध्वी केस कापताना कोणत्याही प्रकारची वेदना दाखवत नाहीत,कारण ही त्यांच्या साधना आणि संयमाची परीक्षा मानली जाते. अशी ही जैन धर्माची पर्युषण परंपरा आहे.