प्रभू रामाने जिथे केले दशरथांचे पिंडदान! भारतातील 'ही' ठिकाणं आहेत श्राद्ध-पिंड दानासाठी प्रसिद्ध, इथे पूर्वजांना मिळतो मोक्ष
यावर्षी 18 सप्टेंबरपासून पितृ पक्ष पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे. यंदाच्या वर्षी श्राद्ध पक्ष हे 2 ऑक्टोबर 2024 रोजी संपणार आहे. हिंदू मान्यतेनुसार, पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांच्या पूजनार्थ पितृ पक्षात श्राद्ध करणे हे महान कार्य आहे. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो, जो अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवसापर्यंत चालू असतो, जो 15 दिवसांनी येतो. पितृ पक्षात श्राद्ध आणि पिंडदान पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. देशात अनेक ठिकाणी पिंडदान केले जाते. मात्र देशातील काही ठिकाणे अशी आहेत जिथे श्राद्ध केल्याने अपार पुण्य मिळते आणि पितरांच्या आत्म्यालाही अपार शांती मिळते, असे मानले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येऊन आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी पिंडदान करत असतात. आम्ही तुम्हाला आज यातील काही प्रसिद्ध ठिकाणांविषयी माहिती करून देत आहोत.
हरिद्वार हे भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. गंगेच्या काठावर वसलेले हे सुंदर शहर आहे आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी तिचे सौंदर्य आणखीनच वाढते. या जागेबाबत अशी धारणा आहे की, यथे गंगेत स्नान केल्यास सर्व पापे नष्ट होतात आणि येथे एखाद्यावर अंत्यसंस्कार केल्यास त्याचा आत्मा स्वर्गात जातो. हरिद्वारच्या नारायणी शिलेवर तर्पण अर्पण केल्यास पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो असे पुराणातही वर्णन करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – जिथे पांडवांची सर्व पापं नष्ट झाली, भारतातील प्राचीन शिवमंदिर, रंजक आख्यायिका, ऑक्टोबरमध्ये करा प्लॅन!
भारतातील पवित्र स्थानांमध्ये मथुरेचा प्रामुख्याने समावेश होतो. इथे अनेक सुंदर मंदिरे आहेत. या ठिकाणाला एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. पिंडदानासाठी हे ठिकाण अनेकांच्या आवडीचे आहे. यमुना नदीच्या काठावर असलेल्या बोधिनी तीर्थ, विश्रामतीर्थ आणि वायु तीर्थ येथे असे विधी केले जातात. मथुरेत तर्पण अर्पण करून लोक आपल्या पूर्वजांना खुश करतात.
मध्य प्रदेशातील उज्जैन हे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जातात. हे ठिकाण पिंडदानासाठीही फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय ते ठिकाण आहे. शहरातून वाहणाऱ्या शिप्रा नदीच्या काठावर पिंड दानाचे आयोजन केले जाते. येथे नदीच्या काठावर पिंडदान करणे फार चांगले मानले जाते. येथे तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त, तुम्ही ओंकारेश्वर, बसवारा, भोपाळ आणि चित्तोडगड अशा जवळील ठिकाणांना भेट देऊ शकता.
हेदेखील वाचा – पितृ पक्षात आवर्जून बनवली जाते खीर, यामागचे कारण आणि रेसिपी जाणून घ्या
भगवान रामाची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध असणारे अयोध्या पिंडदानासाठीदेखील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. पवित्र सरयू नदीच्या काठावर भाट कुंड आहे जेथे लोक हिंदू ब्राह्मण पुजाऱ्याच्या अध्यक्षतेखाली धार्मिक विधी पार पाडतात. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अनेक लोक इथे होमहवनदेखील करतात. इथे पर्यटकांना पाहण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. त्यापैकी काही प्रमुख म्हणजे, फैजाबाद, बिथूर, जौनपूर, वाराणसी, प्रतापगड आणि बस्ती जिथे लोक सर्वाधिक भेट देतात.