बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे
अकोले : येत्या एकोणवीस तारखेला अकोले(जि.नगर)तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे या लोकसभा सदस्यांना संबोधित करणार आहेत. त्या आपल्या गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उलगडून सांगणारा आहेत.दि.१९ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांचे संबोधन सुरू होईल व पुढील एक तास ते सुरू राहील. या दरम्यान ते आपल्या जीवन प्रवासाबद्दल व करत असलेल्या कार्याबद्दल माहिती लोकसभा सदस्यांना देतील .या संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले जाणार असून ते लोकसभा पोर्टल वर व चॅनलवर ही दाखवले जाणार आहे. अशी माहिती डॉक्टर सीमा कौलसिंह यांनी दिली असल्याची माहिती अकोले येथे बायफचे नाशिक विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
आजपर्यंत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्या व जगभर बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी गावातील राहीबाई यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली बीज बँक आपल्या राहत्या घरी छोट्याशा झोपडीत बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने सुरू केली होती. बायफ चे अध्यक्ष गिरीश सोहनी यांच्या हस्ते या बँकेचे उद्घाटन सन २०१४ साली करण्यात आले होते.त्यानंतर राहीबाई यांचा प्रवास सातत्याने गरीब शेतकऱ्यांसाठी बीज निर्मिती व वितरण करून सुरू आहे. त्यासाठी बायफ संस्थेच्या मदतीने कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून त्यामार्फत राज्य आणि देश पातळीवरील बीज संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आलेले आहे.
आज पर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित राहीबाई यांनी आपले जीवन देशी बियाणे संवर्धन करण्यासाठी समर्पित केलेले आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा नारीशक्ती पुरस्कार यापूर्वी प्रदान करण्यात आलेला आहे. पद्मश्री पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा सदस्यांना ते काय मार्गदर्शन करणार आहेत हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे .
बायफ या संस्थेने सुरू केलेल्या देशी बीज संवर्धन उपक्रमाची दखल देश आणि विदेशातही घेण्यात आलेली आहे. त्यानुसार गावोगावी प्रत्येक राज्यात देशी बियाण्यांच्या बँका शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यासाठी केंद्र शासन विशेष प्रयत्न करत आहे .त्यापार्श्वभूमीवर राहीबाई व बायफची तज्ञ टीम येत्या १९ तारखेला लोकसभा सदस्यांना काय संबोधित करणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. या कार्यक्रमाची रियल डॉक्टर सीमा कौल सिंग (डायरेक्टर, संसदीय अभ्यास व प्रशिक्षण बिरो भारत सरकार ) यांच्या मार्गदर्शनाने दिनांक १५ जानेवारी रोजी घेण्यात आलेली आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये बायफ संस्थेच्या वतीने विषय तज्ञ श्री संजय पाटील व विभागीय अधिकारी जितिन साठे हे सौ. राहीबाई पोपेरे यांच्यासोबत सहभागी होणार आहेत.