
Shivsena uddhav Thackeray meet cm devendra fadnavis in vidhimandal mumbai news
Thackeray Fadnavis Meet : मुंबई : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग होताना देखील दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. विधान परिषदेचे सभापती राम कदम यांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळ संपत आला आहे. विधीमंडळामध्ये काल (दि.16) दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. टीका अन् टोमणे मारल्याचे देखील दिसले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेमध्ये सामील होण्याची ऑफर देखील दिली. थेट सभागृहामध्ये दिलेल्या या ऑफरमुळे चर्चांना उधाण आले. फडणवीसांच्या टीकांना उद्धव ठाकरेंनी सभागृहातच उत्तर दिले. यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये खास भेट झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला’ हे पुस्कत देखील भेट दिलं आहे. त्याचबरोबर हे पुस्तक डॉक्टर नरेंद्र जाधव यांना देखील द्यावे असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढली. महायुती सरकारकडून हिंदी भाषा सक्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू दोन दशकांनंतर एकत्र आले. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये मराठी भाषा आणि हिंदी भाषा सक्ती यावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.
विधीमंडळाच्या आवारामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अंबादास दानवे यांच्या कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. जनसुरक्षा विधेयकाबाबतीत महाविकास आघाडी राज्यपालांची भेट घेण्याचे नियोजन करत असून, याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. राज व उद्धव ठाकरे हे मराठी भाषेसाठी आणि अस्मितेसाठी एकत्र येत त्यांनी विजयी सभा घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा रंगलेली दिसून आली. मुंबई पालिका राखण्यासाठी दोन्ही बंधू हे निवडणुकीच्या दृष्टीने एकत्रित येऊन युती करण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी राज ठाकरे हे सावधगिरीची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.