हिंगोली : राज्यातील तापमानात (Maharashtra Temperature) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडताना कमी प्रमाणात दिसत आहेत. त्यात आता हिंगोली जिल्ह्यातील (Rain in Hingoli) अनेक भागांमध्ये आज दुपारच्या सुमारास गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे केळींच्या बागांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
गुंडलवाडी, दांडेगाव, रेडगाव, वडगाव, डोंगरकडा, डिग्रस (बुद्रक), सालापूर, सुकळी, जवळा या सर्व कळमनुरी तालुक्यातील गावांना पावसाचा मोठा फटका बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या झाडांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. हाती आलेल्या पिकांचे डोळ्यासमोर नुकसान होताना पाहताना शेतकरी चिंतेत आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे केळीची पानेही फाटून गेली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हळद भिजली, पिंपळाचे झाडं उन्मळून पडले
अवकाळी पावसाने हजेरी लावताच हळद भीजून गेली आहे. पावसासोबत वादळवारे जोराचे होते. कौठा येथे जुने पिंपळाचे झाडे मुळासकट उन्मळून पडले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे दहा मिनिटे गारांचा पाऊस झाला. डोंगरकडा, जवळापांचाळ, गिरगाव आदी ठिकाणी केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.