मुंबई: राज्य शासन पाण्याच्या स्त्रोतापासून पाण्यातील रासायनिक घटकांच्या तपासणीसाठी पाणी नमुन्यांची तपासणी करते. या नमुन्यांमध्ये शरीरास हानिकारक घटक आढळलेल्या पाणी नमुन्यांच्या ठिकाणी विविध उपायोजना करीत असते. राज्यात नांदेड जिल्ह्यात नायट्रेट बाधित पाणी नमुने आढळलेल्या ६८२ गावांमध्ये शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे. बाधित पाणी नमुने आढळलेल्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे जलशुद्धीकरण प्रकल्प (आर.ओ प्लॅन्ट) उभारण्याची कार्यवाही शासन करेल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
भुजलामध्ये वाढत असलेल्या नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबत विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, केंद्र शासन रँडम पद्धतीने पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करीत असते. तर राज्य शासन पाण्याच्या प्रत्येक स्त्रोतातील पाणी नमुने तपासते. राज्य शासनाच्या नमुन्यांमध्ये ११.६२ टक्के नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण आढळले आहे.
नायट्रेटचे प्रमाण रोखण्यासाठी युरियाच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीवर भर द्यावा लागेल. तसेच उद्योगांमधून येणाऱ्या दूषित पाण्याबाबत एचटीपी प्लांट बसविण्याच्या सूचना देण्यात येतील. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबत उद्योग, पर्यावरण व कृषी विभाग यांची संयुक्त बैठकही घेण्यात येईल. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन विविध उपयोजनांची अंमलबजावणी करत आहे. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार, डॉ नितीन राऊत, प्रशांत बंब, समीर कुणावर, आदित्य ठाकरे, डॉ संजय कुटे यांनी सहभाग घेतला.
मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रशासनाला निर्देश
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेगाव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार मोनिका राजळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील शिंदखेडा तालुक्यातील (जि.धुळे) जल जीवन मिशन अतंर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी योजनांतर्गत कामांची पूर्तता विहीत कालमर्यादेत केली जात नाही, अशा विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा गावात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे जेणेकरुन उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सहजतेने उपलब्ध राहील, असेही पाटील यांनी सांगितले.