राज्यात खातेवाटप झाले असले तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडे अनेक खाती आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय,पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केले विभाग असणार आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत.
खातेवाटपांनंतर आता याचा फटका नेमका कुणाला याची चर्चा होत आहे. भाजपाकडील सहा खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेत.भाजपाकडे असणारी सहा खाती राष्ट्रवादीकडे तर शिंदे गटाची तीन महत्वाची खाती अजित पवार गटाकडे गेली आहेत.
खातं -आधी – आता
1. अर्थ -देवेंद्र फडणवीस – अजित पवार
2. सहकार- अतुल सावे -दिलीप वळसे
3. अन्न आणि नागरी- रवींद्र चव्हाण- छगन भुजबळ
4. वैद्यकीय शिक्षण – गिरीश महाजन – हसन मुश्रीफ
5. क्रीडा – युवक कल्याण- गिरीश महाजन – संजय बनसोडे
6. महिला व बालकल्याण -मंगलप्रभात लोढा- अदिती तटकरे
खातेवाटपाचा फटका कुणाला?
राष्ट्रवादीला खाते देण्यावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता. मात्र, आता खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाकडील कृषी खातं आपल्याकडे खेचून आणण्यात अजित पवार गटाला यश आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.अब्दुल सत्तार यांचं कृषी खातं तर संजय राठोड यांचं अन्न आणि औषध प्रशासन हे खातं गेलय.
शिंदे गट – तीन खाती राष्ट्रवादीकडे
खातं -आधी -आता
1. कृषी -अब्दुल सत्तार -धनंजय मुंडे
2. मदत पुनर्वसन -एकनाथ शिंदे- अनिल पाटील
3. अन्न आणि औषध प्रशासन- संजय राठोड – धर्मवारव बाबा अत्राम
मंत्रिमंडळात फेरबदल
मंत्री -आधीचं खातं – आताचं खातं
1.अब्बुल सत्तार -कृषी -अल्पसंख्याक
2. संजय राठोड -अन्न आणि औषध प्रशासन – मृद आणि जलसंधारण
यातून शिंदेंचे एकनिष्ठ दुखावले जाण्याची शक्यता आहे. खातेवाटपात अर्थमंत्री पद अजित पवार यांना देऊ नये, अशी आग्रही मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती. मुख्यमंत्रीही शिंदे गटाची खाती जाऊ नये, यासाठी आग्रही होते. मात्र तरीही अर्थसह अनेक महत्त्वाची खाती अजित पवारांकडे आली आहेत. आता या खातेवाटपानंतर शिंदे गटातील नाराजी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शिंदे गटापेक्षा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही लोकसभा निवडणुकांसाठी जास्त महत्त्वाची असल्याचा संदेश या विस्तारातून भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं मानलं जातंय. अजित पवार यांच्या गटाची दादागिरी सरकारमध्ये प्रवेशानंतर स्पष्ट दिसत असल्याचं सांगण्यात येतंय, मंत्रिमंडळात सर्व समावेशकता येण्यासाठी हे करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्या सर्कसीनंतरही हे सरकार आता पुढचे वर्ष दीड वर्ष सुरळीत राहील का, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.