Women's T20 World Cup in the UAE
Women T20 World Cup 2024 Move UAE : महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात खेळवला जाणार या विषयावर एक मोठा अहवाल समोर आला आहे. विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे सोपवण्यात आले होते, परंतु देशातील आरक्षणाला विरोध झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) बैठक बोलावावी लागली. आता क्रिकबझच्या अहवालात असे समोर आले आहे की, बैठकीत महिला टी-20 विश्वचषकाचे यजमानपद यूएईकडे सोपविण्यावर विचार करण्यात आला आणि हे जवळपास निश्चित झाले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डसुद्धा बैठकीला उपस्थित
यामध्ये विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) सदस्य आणि संचालकही आयसीसीने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. यूएईमध्ये महिला टी-20 विश्वचषक आयोजित करण्यासही मंडळाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली आहे. बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान, विरोधामुळे प्रभावित झालेल्या देशात विश्वचषक आयोजित करणे योग्य होणार नाही, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या निदर्शनांदरम्यानही ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणे सध्या धोकादायक असल्याचे विधान केले होते.
आणखी तीन देशांची नावे आली पुढे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला T20 विश्वचषक आयोजित करण्याची ऑफर आधीच नाकारली आहे. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान चालेल आणि जय शाह यांनी सांगितले होते की, त्यावेळी भारतात मान्सूनचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे येथे विश्वचषक आयोजित करणे योग्य निर्णय ठरणार नाही.
श्रीलंका आणि झिम्बाब्वेनेही दाखवले स्वारस्य
भारताशिवाय श्रीलंका आणि झिम्बाब्वेनेही विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदासाठी स्वारस्य दाखवले होते. परंतु हवामान आणि इतर अनेक कारणांमुळे युएई हे महिला टी-20 विश्वचषक 2024 चे नवीन यजमान म्हणून निश्चित होणार हे जवळपास निश्चित आहे.