लठ्ठपणामुळे वाढत आहेत अनेक आजार
लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे आणि याचा परिणाम केवळ भारतातच नाही तर आशियातील अनेक देशांमध्ये दिसतोय. नुकतेच एक नवे संशोदन करण्यात आले आहे आणि या संशोधनानुसार, 2030 पर्यंत जगभरात 100 कोटी लोक लठ्ठ होऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त असू शकते.
5 पैकी 1 महिला आणि 7 पैकी 1 पुरुष लठ्ठपणाने ग्रस्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे, कारण लठ्ठपणाचा केवळ शारीरिक आरोग्यावरच नकारात्मक परिणाम होत नाही, तर अनेक जीवघेणे आजारही होऊ शकतात. जाणून घेऊया अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो रिसर्च
रिसर्चमध्ये देण्यात आलेली माहिती
ऑस्ट्रेलियाच्या रूरल हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट, नेपाळ आणि इथिओपियाच्या संशोधकांना त्यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, 15-49 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये लठ्ठपणा महामारीसारखा पसरत आहे. शहरीकरण आणि जीवनशैलीतील बदल ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे. अभ्यासानुसार भारत, बांगलादेश, म्यानमार, नेपाळसह 10 आशियाई देशांतील महिला वेगाने लठ्ठपणाला बळी पडत आहेत. गेल्या दोन दशकांत या देशांमध्ये लठ्ठपणाचा ट्रेंड सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे असं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय.
हेदेखील वाचा – भारतीय तरुणांमध्ये लठ्ठपणा चिंतेचा विषय; आर्थिक सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर!
धक्कादायक आकडे
लठ्ठपणा आजाराबाबत धक्कादायक आकडे
मालदीव वगळता इतर सर्व देशांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये 2012 मध्ये 17.3% महिला लठ्ठ असून ही संख्या 2022 मध्ये 21.8% पर्यंत वाढली आहे. तर दुसरीकडे भारतातही लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. 2005 मध्ये केवळ 2.5 टक्के महिला लठ्ठपणाने ग्रस्त होत्या, आता ही संख्या 5% पेक्षा जास्त झाली असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय.
लठ्ठपणामुळे आजार
लठ्ठपणामुळे त्रस्त लोकांमध्ये अनेक घातक आजारांचा धोका वाढतो. यामध्ये प्रामुख्याने हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा समावेश होतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लठ्ठपणा थांबवण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर 2030 पर्यंत याला महामारीचे स्वरूप येऊ शकते.
हेदेखील वाचा – लठ्ठपणा कमी करण्याचे 4 आयुर्वेदिक उपाय, 1 महिन्यात विरघळेल पोटाची चरबी
लठ्ठपणा टाळण्यासाठी टिप्स
लठ्ठपणा आजार टाळण्यासाठी वेळीच द्या लक्ष
शहरीकरण, अनियमित जीवनशैली आणि जास्त वेळ टीव्ही पाहण्याच्या सवयी ही लठ्ठपणाची प्रमुख कारणे असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. महिलांची जीवनशैली सुधारून शिक्षणाला प्राधान्य दिल्यास ही समस्या टाळता येईल. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि आरोग्य संस्थांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.