
पुण्यातील घटना, डॉक्टरांनी वाचवला चिमुकल्याचा जीव
डॉ. मिलिंद जंबगी आणि बालरोग अतिदक्षता विभागाच्या (PICU) टीमच्या नेतृत्वाखाली या बाळाला साताऱ्याहून पुण्यात सुरक्षितपणे व्हेंटिलेटर सपोर्टवर अंकुरा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता आणले. एंडोस्कोपिक तपासणी आणि चोवीस तास बालरोग अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवत या बालरुग्णाच्या भविष्यातील गुंतागुंत टाळता आल्या.
बालदिनाच्या दिवशी घडला प्रकार
बालदिनाच्या दिवशी, साताऱ्यातील दोन वर्षांच्या अर्जुनला (नाव बदलले आहे) जीवघेण्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला, त्याने नजरचुकीने ॲसिटिक ॲसिडचे सेवन केले, जे सामान्यतः घरगुती साफसफाईसाठी वापरले जाणारे रसायन आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत ठेवलेल्या त्या अॅसिडयुक्त द्रवाने त्याचे ओठ, तोंडाचा पोकळी आणि अन्ननलिका भाजले गेले आणि त्याच्या छातीवर व जांघेत जखमा झाल्या. अर्जुन वेदनेने विव्हळत आणि श्वास घेण्यासाठी धडपडत असल्याचे पाहून त्याचे पालक प्रचंड घाबरले.
परिस्थिती गंभीर
अर्जुनला तात्काळ साताऱ्यातील रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉ. घोरपडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे हे लक्षात घेत, त्यांनी त्या बालरुग्णावर त्वरित उपचारांना सुरुवात केली. डॉ. मिलिंद जंबगी यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याहून अंकुरा हॉस्पिटलची टीम साताऱ्याला पोहोचली. त्यांच्या विशेष रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर सपोर्टवर या बालरुग्णाला यशस्वीरित्या पुण्यात आणले. पुण्यातील अंकुरा रुग्णालयात दाखल झाल्यावर, बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद जंबगी आणि त्यांच्या टिमने हे गुंतागुंतीचे प्रकरण यशस्वीरित्या हाताळले.
तज्ज्ञांनी दिली माहिती
डॉ. मिलिंद जंबगी पुढे सांगतात की, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन येथे दाखल झाल्यावर अर्जुनच्या शरीरावर भाजल्याच्या जखमा होत्या आणि त्याच्या तोंडाच्या आतला त्वचा सोलली गेली होती. तातडीने केलेल्या एंडोस्कोपीमध्ये अन्ननलिकेला देखील जखमा झाल्याचे दिसून आले.
मुलाचा श्वासोच्छवास स्थिर होईपर्यंत व्हेंटिलेटरचा आधार देण्यात आला. छाती आणि जांघेवरील रासायनिक जखमांवर संसर्ग टाळण्यासाठी आणि जखमा भरण्यास मदत करण्यासाठी विशेष ड्रेसिंग आणि औषधोपचार करण्यात आले. लहान मुलांनी ॲसिडयुक्त पदार्थ गिळणे जीवघेणे ठरु शकते. अर्जुनच्या बाबतीत, आम्ही एकाच वेळी श्वसनमार्गातील जखमा व अडथळा, अन्ननलिकेला झालेली इजा आणि इतर बाह्य जखमा या तिन्ही समस्यांना तोंड देत होतो.
बाळाची प्रकृती स्थिर करणे, सुरक्षित वैद्यकीय व्यवस्थापनाने नेक्रोसिस, परफोरेशन, डिससेमिनेटेड इंट्राव्हस्कुलर कोएग्युलेशन, शॉक आणि सेप्सिस यांसारख्या जीवघेण्या समस्या टाळण्यास मदत झाली. आमच्या पीआयसीयू (PICU) टीमने या बालरुग्णाच्या श्वसनमार्ग, पोषण आणि जखमा भरण्यासाठी चोवीस तास निरीक्षण व उपचार केले. डॉ. मिलिंद जंबगी पुढे सांगतात की, घरातील प्रौढांनी आपल्या घरात असलेले रासायनिक द्रव्य, ॲसिडयुक्त पदार्थ व इतर औषधे आपल्या बाळापासून दूर आणि सहजासहजी हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावे.
कशी झाली रिकव्हरी
या प्रकरणात बालरुग्णाला अन्ननलिकेला पुढील इजा टाळण्यासाठी सुरुवातीला नळीद्वारे आणि नंतर गिळण्याची क्रिया सुधारल्यावर तोंडावाटे आहार देण्यात आला. पुढील काही दिवसांत, त्या लहान मुलाने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला, तो व्हेंटिलेटरशिवाय आता उपचारांना प्रतिसाद देत होता, भाजलेल्या जखमा भरून येत होत्या आणि तो तोंडावाटे अन्नाचे सेवन करु लागला होता. एका आठवड्यानंतर, अर्जुनला घरी सोडण्यात आले. डॉ. मिलिंद पुढे सांगतात की पालकांनी सतर्क रहावे आणि घरातील सर्व रसायने, औषधे आणि धारदार वस्तू मुलांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घ्यावी.
Cancer: फास्ट फूडचे सेवन आणि ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमुळे वाढतोय कर्करोगाचा धोका, तज्ज्ञांचा इशारा