वाढत्या प्रदुषणामुळे दम्याच्या रूग्णात ४० टक्क्यांनी वाढ
बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. राज्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे दम्याच्या आजारांसह इतर आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. दमा झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दम्याची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करावे. दमा झाल्यानंतर फुफ्फुसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय श्वास घेताना अनेक अडथळे निर्माण होतात.(फोटो सौजन्य – iStock)
दम्याच्या आजारामध्ये श्वसननलिकेला सूज येते. यामुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात आणि जास्त खोकला येतो. अस्थमाचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. बदलत्या ऋतूनुसार सर्दी-खोकला यांसारख्या आजारांची समस्या उद्भवते. अशावेळी औषधे घेतल्यानंतर सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. पण जर औषधं घेऊनही या समस्येपासून सुटका होत नसेल आणि दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करु नका. दीर्घकाळ खोकला हे अस्थमा म्हणजे दम्याचं लक्षण असू शकते.
दम्याच्या रुग्णांना खोकल्याची समस्या नेहमीच असू शकते आणि ही समस्या विशेषतः रात्रीच्या वेळी, हसताना आणि कधीकधी व्यायाम करताना वाढते. दम्यामध्ये रुग्णाला छातीत घट्टपणा जाणवतो. दम्यामध्ये छाती जड झाल्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा शारीरिक काम करताना ही समस्या वाढू शकते. उपचारांविना दम्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा त्रास आणखी वाढू शकतो. अशा व्यक्तींना सतत दमल्यासारखं वाटतं, घरी, शाळेत नीट अभ्यास करता येत नाही, शाळा किंवा कामाच्या ठिकाणी योग्य काम करता येत नाही. काही लोकांमध्ये फुप्फुसापर्यंत संसर्ग होण्याचा धोका असतो.
अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सम्राट शहा म्हणाले की, गेल्या काही वर्षात पुण्यात बांधकाम आणि रस्ते बांधणी मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने हवेतील गुणवत्तेवर विपरित परिणाम झाला आहे. वातावरणातील या धुळीमुळे अलर्जी होऊन अनेक जण दम्यांचे शिकार होत आहेत. मागील काही वर्षात दम्याच्या रूग्णात 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे काही जणांना वारंवार सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने ते उपचारासाठी रूग्णालयात येत आहेत. दर महिन्याला रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात खोकल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या 10 पैकी 4-5 जणांना दम्याचा विकार असतो. परंतु, अनेकदा यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्याने याकडे दुर्लक्ष केलं जातं. काहींच्या घरात एखाद्याला आधी अस्थमा असल्यास कुटुंबातील इतर व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, वेळीच निदान व उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात राहू शकतो. मात्र, अनेकांना या आजाराच्या लक्षणांची माहिती असते. पण छातीत जडपणा येणे हे दम्याचे लक्षण आहे. बऱ्याचदा तर अशाप्रकारचे एकही लक्षण आढळून येत नाही. केवळ खोकलाच होतो अशावेळी या खोकल्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, हा खोकला दम्यामुळेच असू शकतो. म्हणून दिर्घकालीन खोकला, घशातून खरखर आवाज येणे, छाती भरून येणे ही दम्याची लक्षणं असू शकतात. या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
डॉ. सम्राट पुढे म्हणाले की, वारंवार सर्दी होणे, शिंका येणे, घशातून खरखर आवाज येणे, वातावरण बदलल्यावर सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव होणे अशी लक्षणे आढळून आली तर तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. डॉक्टर वैद्यकीय परीक्षण करून दम्याचे निदान करतात. ‘पीक-फ्लो’ मीटरसारख्या यंत्राद्वारे रुग्णाची हवा फुंकण्याची क्षमता तपासून फुफ्फ्साची क्षमता तपासण्यात येते. त्यामुळे दमा आहे की नाही याचे प्राथमिक निदान शक्य होते. दमा आहे की नाही याचे निदान करण्यासाठी लंग्ज फंक्शन टेस्ट (फुफ्फुसाच्या कार्याची चाचणी) करावी लागते. त्यास ‘स्पायरोमीटरी’ असे म्हणतात. याशिवाय रक्ताची तपासणी, एक्स-रे काढणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे, अन्य आजारांमुळे तर दम लागत नाही याची चाचणी करण्यासाठी अन्य तपासण्या कराव्या लागतात.
बहुतेक लोकांना सर्दी किंवा ब्राँकायटिसमध्ये कफ किंवा कोरडा खोकला येतो. परंतु, ते देखील दम्याचे लक्षण देखील असू शकते. ज्या गोष्टींमुळे दमा वाढू शकतो, त्या गोष्टींपासून दमारुग्णांनी दूर राहणे अत्यावश्यक आहे. दमाग्रस्त व्यक्तींनी कुठल्याही प्रकारच्या धुळीपासून, धुरापासून अगदी उदबत्तीच्या धुरापासूनही दूर राहणे गरजेचे आहे. याशिवाय त्यांनी तंबाखूचे सेवन व धूम्रपान प्रकर्षाने टाळले पाहिजे, असेही डॉ. सम्राट म्हणाले.