
हिवाळ्यात निसर्गाच्या कुशीत भटकंती! कुटुंबासोबत महाराष्ट्र फिरायचं तर या 6 पर्यटन स्थळांना भेट द्यायलाच हवी
भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
राज्यात थंडीची चाहूल लागताच पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करणाऱ्या मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. चंद्रपूर जिल्ह्याच्या मध्यभागी निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे. या अभयारण्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम आहे. येथे थंड वातावरणात बहरलेल्या निसर्गाचा आनंद मनसोक्त लुटता येतो. त्याचबरोबरीने मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात जंगल सफारीही आरामदायक ठरते. शिवाय वन्यजीव दिसण्याचीही शक्यता अधिक असते. सफारीदरम्यान दाट धुक्यामध्ये वाघाचे दर्शन घडणे म्हणजे नयनरम्य अनुभवच आहे. वाघांबरोबरच अन्य वन्यजीव मोर, वानर, बिबट्या, अस्वल आणि बऱ्याच पक्षांच्या प्रजाती प्रत्यक्षात पाहता येतात. अभयारण्यातील पक्षांचा किलबिलाट कानावर पडणे आणि विविध वन्यजीव जवळून पाहणे हा अद्वितीय अनुभव आहे.
चिखलदरा
अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण म्हणजे चिखलदरा. विदर्भातील हे थंड हवेचे ठिकाण घनदाट जंगल, जैवविविधतेने बहरलेले आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण आहे जिथे कॉफीची शेती केली जाते. डोंगर भागातील असणारे कॉफीचे मळे, याच शेतीचा दरवळणारा सुगंध पर्यटकांना अधिक भावतो. धुक्यामध्ये हरवलेले रस्ते, खोल दऱ्यांचे विहंगमय दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी चिखलदऱ्यामध्ये आवर्जुन गर्दी करतात. जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प असल्याने वन्यजीव प्रेमींना येथे वाघ पाहण्याचीही संधी मिळू शकते. वन्यजीवांच्या दुर्मिळ प्रजाती, विविध पक्षी, वनस्पतीही इथे आढळतात. निसर्गरम्य वातावरणात स्वर्गसुख अनुभवायचे असेल तर तुम्ही चिखलदऱ्याला नक्की भेट देऊ शकता.
कुणकेश्वर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुशीत वसलेले सगळ्यात सुंदर आणि शांत असणारे तीर्थक्षेत्र म्हणजे कुणकेश्वर. कोकणातल्या समुद्रकिनारी डौलाने उभ्या असणाऱ्या या ठिकाणाला महाराष्ट्रातील ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते. कुणकेश्वर प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराचा आजूबाजूचा परिसरही पर्यटकांना अधिक आकर्षित करतो. समुद्राच्या लाटांचा आवाज, भक्तीमय वातावरण, नारळांच्या झाडांनी नटलेला परिसर, स्वच्छ समुद्रकिनारा म्हणजे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. कुणकेश्वरला धार्मिक महत्त्व आहेच, पण त्याचबरोबरीने खवय्यांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. अस्सल कोकणी पद्धतीची मासे थाळी, नारळापासून बनवलेले पदार्थ आदी खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारतात.
तारकर्ली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा उल्लेख होताच तारकर्लीचे निसर्गसौंदर्य आणि स्वच्छ समुद्रकिनारा डोळ्यासमोर उभा राहतो. कुणकेश्वरपासून अगदी जवळच असलेले हे ठिकाण कोकण संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवते. जलक्रिडा प्रेमींसाठी तर तारकर्ली म्हणजे आकर्षणाचे ठिकाण आहे. स्वच्छ समुद्र असल्यामुळे इथे स्कुबा डायव्हिंग करण्याकडे पर्यटकांचा अधिक कल असतो. साहसी पर्यटकांसाठी विविध जलपर्यटन क्रिडाही येथे उपलब्ध आहेत. जवळच सिंधुदुर्ग किल्ला असल्यामुळे इतिहासप्रेमींना हे ठिकाण अधिक भुरळ घालते. तारकर्लीमधील मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे कारली नदी. या नदीमध्ये बोट राइड करणे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरते. त्याचबरोबरीने येथे कोकणातील खाद्यसंस्कृतीची नव्याने ओळख होते. येथे उपलब्ध असणारे ताजे मासे, त्यापासून बनवण्यात येणारे विविध खाद्यपदार्थ, उकडीचे मोदक, सोलकढीचा स्वाद पर्यटक घेऊ शकतात.
अजिंठा वेरूळ लेणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा व वेरूळ लेण्यांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. युनेस्को मान्यताप्राप्त या लेण्या भारतीय कलेचे सर्वोत्तम दर्शन घडवतात. शिल्पांवरील कोरीव काम, शिलालेख, शांत वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. अजिंठा लेणी प्राचीन बौद्ध गुहा मंदिरांचे दर्शन घडवते. प्राचीन भारतातील बौद्ध भिक्षूंच्या जीवनपद्धती येथे जवळून अनुभवता येतात. तर वेरूळ लेण्यांमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचे दर्शन घडते. एकाच मोठ्या दगडापासून कोरलेले कैलास मंदिर पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात. हिवाळ्यात या लेण्यांच्या विस्तीर्ण परिसरात भटकंती करणे अधिक आरामदायक ठरते.
अनोखा टेलिफोन ‘बूथ’ जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो… हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या
पन्हाळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला असलेला पन्हाळा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये वर्षानुवर्षे इतिहासाची साक्ष देत उभा आहे. कोल्हापूर जवळील हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करुन देतो. किल्ल्याच्या तटबंदीवरुन दिसणारा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना सुखावणारा आहे. हिवाळ्यातील थंड वातावरणात पन्हाळा किल्ल्यावर मनसोक्त फिरण्याची आणि येथील आजूबाजूच्या परिसरात रमून जाण्याची मजा काही औरच आहे. युनेस्को मान्यताप्राप्त असलेल्या पन्हाळा किल्ल्याच्या विस्तीर्ण परिसरामध्ये घनदाट जंगलामधून वाटा काढत तुम्ही गिर्यारोहण करु शकता. शिवाय पन्हाळ्याला गेल्यानंतर जवळच्या अंतरावर असलेल्या कोल्हापूर अंबाबाई मंदिराला भेट देणे उत्तम पर्याय आहे.