
हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसावर होतोय परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
त्याचवेळी, लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कर्करोग हे आजही भारतातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमागचे आघाडीचे कारण आहे व राष्ट्रीय कर्करोग नोंदणीच्या अंदाजानुसार 2025 सालामध्ये कर्करोगाच्या एकूण प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यातील अधिकाधिक चिंताजनक बनत चाललेली बाब म्हणजे शहरभरातील सर्वच हॉस्पिटल्समधील डॉक्टर्सकडे फुफ्फुसांच्या कर्करोगाचे असे रुग्ण येत आहेत, ज्यांनी कधीही धूम्रपान केलेले नाही – यात स्त्रिया आणि तुलनेने तरुण व्यक्तींचा समावेश आहे. हा बदल जागतिक स्तरावरील संशोधनांच्या निष्कर्षांना प्रतिबिंबित करणारा आहे, ज्यात वायू प्रदूषणाला प्रथम गटातील कर्ककारक प्रदूषक मानण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रदूषण तंबाखूइतक्याच धोकादायक श्रेणीमध्ये दाखल झाले आहे. क्लिनिशियन्सच्या दृष्टीने धोक्याचे हे बदलते स्वरूप एक अत्यंत महत्त्वाचा संदेश नव्याने देऊ पाहत आहे: लक्षणे लवकर ओळखणे व वेळच्यावेळी निदान करून घेणे अत्यावश्यक आहे, कारण आज फुफ्फुसांच्या कर्करोगावरील उपचारांत झालेल्या प्रगतीमुळे लवकर निदान झाल्यास अधिक वैयक्तिकृत, प्रभावी देखभाल शक्य आहे.
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. पुष्पक चिरमडे, संस्थापक आणि संस्थापक, सर्टिफाइड इन इम्युनो-ऑन्कोलॉजी, प्रिसिशन ऑन्कोलॉजी, नवी मुंबई म्हणाले, “भारतीय शहरांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगांच्या प्रकरणांचे स्वरूप बदलत असल्याचे आम्हाला आढळून येत आहे. अजूनही धूम्रपान हा प्रमुख धोकादायक घटक असला तरीही आता ते एकमेव कारण उरलेले नाही. घराबाहेर तसेच घरातही दीर्घकाळासाठी प्रदूषित हवेच्या संपर्कात राहणे, हे आजारासाठी कारणीभूत ठरणारे लक्षणीय कारण म्हणून, विशेषत: धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये पुढे येत आहे.
खोकला, धाप लागणे किंवा छातीत अस्वस्थ वाटणे यांसारखी लक्षणे सातत्याने दिसत राहिल्यास हे फक्त प्रदूषणाशी संबंधित असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. लवकरात लवकर निदान झाल्यास खरोखरीच फरक पडू शकतो. विशेषत: आज रुग्णाच्या स्थितीशी अधिकाधिक प्रमाणात जुळवून घेण्याची मुभा देणाऱ्या, सर्जरीपासून ते टार्गेटेड थेरपीजपर्यंत व इम्युनोथेरपीजपर्यंतच्या उपचाराच्या अनेक पद्धती असताना तर असा विलंब करताच कामा नये. जितक्या लवकर आजाराचे निदान होईल, तितकीच रुग्ण वाचण्याची शक्यता वाढते व जीवनमानाचा दर्जाही अधिक चांगल्या प्रकारे जपता येईल.” तर मग शहरी जीवनातील नेमक्या कोणत्या गोष्टी भारतीयांच्या फुफ्फुसांना धोका निर्माण करत आहेत?
बाहेरची हवा कधीही बाहेर राहत नाही
शहरातील हवेमध्ये कायमच वाहनातून होणारे उत्सर्ग, बांधकामांमुळे उडणारी धूळ, औद्योगिक विसर्ग आणि जाळला जाणारा कचरा हे सारे मिसळलेले असते. यातील सर्वात धोकादायक घटक – PM2.5 (पार्टिक्युलेट मॅटर) अदृश्य, अतीसूक्ष्म असतो व फुफ्फुसांमध्ये अत्यंत खोलवर प्रवेश करण्याची क्षमता त्यात असते. प्रदीर्घ काळ PM2.5 च्या संपर्कात आल्यास लवकर बरे न होणारे इन्फ्लमेशन उद्भवते व DNA ची हानी होते, ज्यामुळे कर्कपेशी विकसित होण्यास व वाढण्यास पोषक स्थिती तयार होते.
जागतिक स्तरावर झालेल्या अनेक संशोधनांमधून PM2.5 ची वाढती पातळी आणि अगदी भूतकाळात कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तींच्या बाबतीतही फुफ्फुसांच्या कर्करोगाचा वाढलेला धोका यांतील थेट संबधांना पुष्टी दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटकाच्या संपर्काची सुरक्षित न्यूनतम पातळी वैज्ञानिकांना सापडलेली नाही.
घराच्या आतील वायू प्रदूषण जणू शहरांतील ब्लाइंड स्पॉट आहे
शहरात राहणाऱ्या अनेक भारतीयांना घर म्हणजे प्रदूषणापासून अभय देणारी जागा वाटते. मात्र प्रत्यक्ष पुराव्यांतून काही वेगळ्यात गोष्टी सूचित होतात. घराच्या आतील हवा, विशेषत: मर्यादित वायूविजन असलेल्या लहान अपार्टमेंट्समधील हवा बाहेरच्या हवेइतकीच किंबहुना काहीवेळा त्याहूनही अधिक प्रदूषित असू शकते.
एअर प्युरिफायर्सचा वापर वाढला असला तरीही, मोठ्या आंचेवर शिजवले जाणारे अन्न, तेलाचा धूर, अगरबत्त्या, मस्किटो कॉइल्स, एअरोसोल स्प्रे आणि हवा बाहेर घालविण्याची नीट व्यवस्था नसणे ही सर्व कारणे घराच्या आतील पार्टिक्यलेट मॅटर व कर्ककारक संयुगांमध्ये भर टाकतात. अगदी एलपीजीचा वापर असलेल्या घरांनाही चिमणी किंवा हवा बाहेर जाण्याची सोय नसल्यास या प्रदूषणकारी घटकांचा तितकाच धोका संभवतो.
शहरी नोकऱ्यांसोबत येतात अदृश्य व्यावसायिक धोके
वेगवान नागरीकरणामुळे कामाच्या काही विशिष्ट जागांशी येणारा संपर्क अधिक दाट झाला आहे व त्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका मूकपणे वाढत आहे. बांधकाम मजूर सिलिकाची धूळ श्वासावाटे शरीरात घेतात, ड्रायव्हर्स सतत डिझेलचा उत्सर्ग सहन करत असतात आणि जुन्या इमारतींमध्ये राहणारे अजूनही एसबेस्टॉसच्या संपर्कात येऊ शकतात. व्यवसायाच्या निमित्ताने या घटकांशी येणारा संपर्क क्वचितच केवळ तेवढ्यापुरता मर्यादित राहतो – बहुतेकदा वातावरणात आधीच वाढलेल्या वायू प्रदूषणामध्ये त्याची भर पडलेली दिसते, ज्यामुळे फुफ्फुसाच्या टिश्यूजना दीर्घकालीन इजा पोहोचण्याची शक्यता वाढते.
शहरी राहणीमानात दुर्लक्ष करू नये अशा लक्षणांचे सामान्यीकरण होते
सततचा खोकला, धाप लागणे, छातीत अस्वस्थ वाटणे किंवा श्वसनसंस्था वारंवार संसर्गित होणे या गोष्टींना बरेचदा “प्रदूषणाचे परिणाम” किंवा शहरातील मोसमी आजारपण म्हणून झटकून टाकले जाते. यामुळे निदान करून घेण्यासाठी सहजच टाळाटाळ केली जाते. जेव्हा लक्षणांची तपासणी केली जाते, तेव्हा रुग्णाचे आजारपण आधीच गंभीर टप्प्यावर पोहोचलेले असते, जिथे उपचारांचे मोजके पर्याय हाती उरतात आणि त्यांचे चांगले परिणामही मिळत नाहीत.
लवकर निदान झाल्यास उपचारांच्या क्षमता विस्तारतात
अलीकडच्या वर्षांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारांत बदल झाले आहेत व आजार कोणत्या टप्प्यावर आहे व त्याचे मॉलेक्युलर प्रोफाइल काय आहे हे पाहून त्या आधारे उपचार देण्याचे प्रमाण वाढत आहे. जेव्हा आजाराचे लवकर निदान होते, तेव्हा रुग्णांना शस्त्रक्रियेने ट्यूमर्स काढून टाकणे, प्रगत रेडिएशन तंत्रे, जेनेटिक मार्कर्सच्या मार्गदर्शनाखाली वापरल्या जाणाऱ्या टार्गेटेड व प्रगत उपचारपद्धती व कर्करोगाशी लढा देण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेची मदत करणारी इम्युनोथेरपी अशा अनेक पर्यायांवर चर्चा करता येते. म्हणूनच लवकरात लवकर निदान केवळ रुग्ण बचावण्याचे प्रमाणच वाढत नाही; तर त्यामुळे उपचारांचे पर्याय विस्तारतात व रुग्णांना आणि त्यांची देखभाल करणाऱ्या व्यक्तींना अत्यंत गरजेचा असलेला आराम मिळतो व त्यांच्या जीवनमानाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा होते.
फुफ्फुसांना इजा का होते
श्वास घेण्याची क्रिया आपोआप घडत असली तरीही आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्या हवेचे संरक्षण करण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करण्याची गरज असते. भारताची फुफ्फुसांच्या कर्करोगाची कहाणी आता केवळ सिगारेटची पाकिटे आणि धूम्रपानाची आकडेवारी इतक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर ट्राफिक जॅम्स, बंद अपार्टमेंट्स, वायूविजन नसलेली किचन्स आणि तयार झालेला धूर जिथे खूप काळ रेंगाळत राहतो अशा घरांतून ती सर्वांच्या नकळत आकार घेत आहे. यामागील विज्ञान सुस्पष्ट आहे: प्रदूषित हवेशी दीर्घकाळ संपर्क आल्यास फुफ्फुसांना इजा होऊ शकते जिचे तंबाखूमुळे होणाऱ्या हानीशी आश्चर्य वाटावे इतके साधर्म्य आहे, व त्यामुळे सर्वसाधारण लोकसंख्येतही कर्करोगाची शक्यता चेतवली जात आहे.
भारताच्या शहरांतील परिस्थिती सतत बदलत असताना, फुफ्फुसांचे आरोग्य टिकविण्यासाठी हॉस्पिटल्स व क्लिनिक्सच्या पलीकडे जाणाऱ्या, घरे, कामाच्या जागा व खुद्द शहर नियोजनालाही सामावून घेणाऱ्या कृतींची गरज भासणार आहे. कारण, श्वास घेणे ही एक आपोआप होणारी कृती असली तरीही आपण ज्या हवेत श्वास घेतो तिचा दर्जा पाहता आपली फुफ्फुसे आपल्याला गंभीर इशारा देत आहेत.
फुफ्फुसांमध्ये चिटकून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन