
'कामा'च्या आयसीयूत श्वसनविकारग्रस्त बालकांच्या रुग्णसंख्येत वाढ!
कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात २०२५ या वर्षांत एकूण ३३५ नवजात बालकांना उपचारासाठी दाखल करावे लागले. यामध्ये श्वसनविकार आणि त्यासंबंधित गुंतागुंतींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे रुग्णालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. एकूण दाखल रुग्णांपैकी ट्रान्झियंट टॅकिप्निया ऑफ न्यूबॉर्न श्वसनविकारामुळे सर्वाधिक म्हणजे ८६ नवजातांना दाखल करावे लागले. त्याखालोखाल फक्त श्वसनविकार असलेल्या ६४, तर मेकोनियम स्टेन्ड लिकरसोबत श्वसनविकार असलेल्या २९ बालकांचा समावेश आहे. जन्मावेळी गुदमरल्यामुळे श्वसनविकार झालेल्या १५ नवजातांवर उपचार करण्यात आले, मात्र या हे प्रमाण ‘नॉर्मल’ असल्याचे शिशुरोगविकार तज्ज्ञ सांगत आहेत.(फोटो सौजन्य – istock)
दरम्यान, कमी जन्मवजन, अकाली जन्म, गर्भातील वाढ खुंटलेली, कमी वजनासह श्वसनदाह असलेली ३ बालके एनआयसीयूमध्ये दाखल झाली. अन्न न घेणे, फीड इन्टॉलरन्स, आईला मधुमेह असल्याने रक्तातील साखरेच्या तपासणीसाठीसह जन्मजात विकारांचाही एनआयसीयूमधील रुग्णसंख्येत लक्षणीय वाटा दिसून आला. तसेच गर्भावस्थेतील सोनोग्राफीमध्ये जन्मजात दोष आढळल्याने निरीक्षणासाठी दाखल केलेल्या बालकांचाही समावेश आहे. संक्रमणाच्या दृष्टीने पाहता नवजातांवर विशेष निरीक्षण ठेवण्यात आले.
नवजात अतिदक्षता विभागात श्वसनाशी संबंधित आजारांशी दाखल होणाऱ्या बाळांची संख्या तुलनेने अधिक आहे. प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या तासांत काही बाळांमध्ये श्वसनाचा तात्पुरता त्रास दिसून येतो. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना एनआयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवावे लागते. वेळेवर उपचार आणि योग्य वैद्यकीय देखरेखीमुळे बहुतेक नवजातांची प्रकृती लवकर स्थिर होते, – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, ऑलब्लेस अॅड कामा रुग्णालय, यांनी सांगितले आहे.
व्हीडिआरएल, टीपीएचए, एचबीएसजी आणि एचसीव्ही पॉझिटिव्ह मातांपासून जन्मलेल्या नवजात बालकांना उपचारासाठी दाखल करावे लागले. तज्ज्ञांच्या मते, श्वसनविकार, अकाली प्रसूती आणि मातृआरोग्याशी संबंधित जोखमी या नवजात अतिदक्षता सेवांवरील ताण वाढवत आहे.