
700 वर्षे जुना तो किल्ला जिथे झालं होत कतरिना-विकीच लग्न; राजेशाही काळापासूनची वास्तू आता बनलीये लग्झरी रिसॉर्ट
राजेशाही भूतकाळाचे प्रतीक – बरवाडा किल्ला
सवाई माधोपूर जिल्ह्यात, रणथंभोरच्या जवळ वसलेला हा भव्य किल्ला 14व्या शतकात चौहान वंशाने बांधला होता. तो काळी हा किल्ला युद्ध, शौर्य आणि राजघराण्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. नंतर 1734 साली राजावत घराण्याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि आजही त्यांचा याच ठिकाणाशी गहिरा संबंध टिकून आहे.
या किल्ल्याच्या काही अंतरावर “चौथ का बरवाडा” मंदिर आहे, जे या ठिकाणाचे धार्मिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जाते. म्हणतात की, चौहान राजाला एकदा स्वप्नात देवी चौथ दर्शनास आल्या आणि त्या आदेशानुसार त्यांनी सुमारे 1100 फूट उंच टेकडीवर हे मंदिर उभारले. आजही हे मंदिर भक्तांसाठी आस्था आणि श्रद्धेचे केंद्र आहे.
भग्नावस्थेतून आलिशान हॉटेलपर्यंतचा प्रवास
एकेकाळी राजवाडा असलेला हा किल्ला आज जागतिक दर्जाच्या लक्झरी हॉटेलमध्ये रूपांतरित झाला आहे. “सिक्स सेन्सेस” समूहाने या ऐतिहासिक वारशाला नवी ओळख देण्याचा संकल्प केला ज्यात जुन्या वैभवाचा आत्मा जपून आधुनिकतेचा स्पर्श देण्यात आला.
सुमारे दहा वर्षे चाललेल्या पुनर्बांधणीच्या कामात 750 हून अधिक कारागीर, वास्तुशास्त्रज्ञ आणि संरक्षण तज्ज्ञ सहभागी झाले. प्रत्येक झरोखा, मेहराब आणि अंगण पूर्वीच्या काळातील कलात्मकतेची आठवण करून देतो. परिणामी, आजचा बरवाडा फोर्ट इतिहास आणि आधुनिक विलासिता यांचा उत्कृष्ट संगम साकारतो.
वास्तुशैलीतील राजपूत-मुघल मिलाफ
बरवाडा फोर्टच्या रचनात राजपूत आणि मुघल या दोन्ही शैलींचा सुंदर मिलाफ दिसतो. विशाल दरवाजे, नक्षीदार झरोखे आणि कलात्मक जाळ्या राजपूत सौंदर्य दाखवतात, तर समरूप अंगणे आणि उंच मेहराब मुघल शैलीचे दर्शन घडवतात. येथील भिंतींवर शेखावटी शैलीतील फ्रेस्को पेंटिंग्ज आढळतात, ज्यात स्थानिक लोककथा आणि देव-देवतांचे दर्शन रंगवलेले आहे. पुनर्बांधणी दरम्यान पारंपरिक साहित्य – चूनेची गारा आणि स्थानिक दगड – वापरून याची मूळ ओळख जपली गेली आहे.
ते लग्न ज्याने किल्ल्याला दिली जागतिक प्रसिद्धी
डिसेंबर 2021 मध्ये विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न येथे पार पडले आणि तेव्हापासून बरवाडा किल्ला जगभरात चर्चेत आला. पारंपरिक राजस्थानी संगीत, सोनेरी रोषणाई आणि किल्ल्याच्या भव्यतेने सजलेले समारंभ जणू एखाद्या स्वप्नासारखे भासत होते. त्या लग्नानंतर या ठिकाणाची ओळख “रॉयल वेडिंग डेस्टिनेशन” म्हणून झाली. आज जगभरातील पर्यटक येथे येतात. काही इतिहास अनुभवण्यासाठी, तर काही राजेशाही आरामाचा आनंद घेण्यासाठी.
सस्टेनेबल लक्झरी
बरवाडा फोर्ट केवळ ऐश्वर्याचे नाही, तर पर्यावरणपूरक जीवनशैलीचेही प्रतीक आहे. रणथंभोर टायगर रिझर्व्हजवळ असल्याने, येथे निसर्ग आणि वन्यजीवांचे जतन हे प्राधान्याने जपले जाते. फोर्टमध्ये फक्त 48 सूट्स आहेत, जेणेकरून पर्यावरणावर भार पडू नये. येथे प्लास्टिकविरहित व्यवस्था, पाण्याचे संवर्धन आणि स्थानिक समाजाशी सहभाग अशा उपक्रमांद्वारे शाश्वत पर्यटनाचा आदर्श निर्माण केला आहे.
येथील एका रात्रीचा खर्च साधारणपणे ₹55,000 ते ₹75,000 पासून सुरू होतो आणि प्रीमियम सूट्ससाठी ₹2.5 लाखांपर्यंत पोहोचतो. मोठ्या समारंभांसाठी संपूर्ण फोर्ट बुक करणे म्हणजे कोट्यवधींचा खर्च पण अनुभव अमूल्य असतो. सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा हे सिद्ध करते की, इतिहासाचे जतन आणि आधुनिकतेचे स्वागत एकत्र शक्य आहे. ही ती जागा आहे जिथे राजेशाही परंपरा, कला आणि ऐश्वर्य आजही एकत्र नांदतात जणू काळ थांबला आहे, पण भव्यता कायम आहे.