
साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
Beauty Tips: बरेच जण आंघोळीसाठी साबण वापरतात पण आता बॉडी वॉश वापरणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो की, नेमका यामध्ये काय फरक आहे कारण दोन्हीचा वापर हा शरीरावरील मळ स्वच्छ करून फ्रेशनेससाठीच करण्यात येतो. साबण आणि बॉडी वॉशमधील मुख्य फरक हा आहे की साबण घन स्वरूपात असतो आणि त्वचेची खोलवर स्वच्छता करतो, तर बॉडी वॉश एक द्रव क्लीन्झर आहे जो त्वचेची स्वच्छता करण्यासोबतच अधिक ओलावा अर्थात हायड्रेशन आणि आर्द्रता प्रदान करतो.(फोटो सौजन्य – istock)
पारंपरिक साबण तेल किंवा चरबीला अल्कली सोबत सॅपोनिफिकेशनद्वारे एकत्र करून बनवला जातो. तर बहुतेक बॉडी वॉश पाण्यावर आधारित असतात आणि त्यात कृत्रिम डिटर्जंट आणि फेस निर्माण करणारे घटक असतात.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा त्वचेवरील परिणाम नक्की काय होते. तर साबण त्वचेतील नैसर्गिक तेल आणि खोलवर साचलेली घाण लवकर काढून टाकतो, ज्यामुळे कधीकधी त्वचा कोरडी वाटू शकते. बॉडी वॉशमध्ये अतिरिक्त मॉइश्चरायझिंग घटक असतात जे कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर असतात.
याची वापरण्याची पद्धतही वेगळी आहे. साबण थेट त्वचेवर चोळून वापरला जातो, तर बॉडी वॉश सामान्यतः लूफा किंवा स्पंजने लावला जातो, ज्यामुळे जास्त फेस तयार होतो. साबण अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असतात, तर बॉडी वॉश प्रवास आणि स्वच्छतेसाठी सोयीस्कर मानले जातात. त्यामुळे खरं तर दोन्हीचा वापर आपापल्या ठिकाणी योग्यच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.