
बोगस दिव्यांग आता मोबाइलच्या रडारवर! प्रवासातही 'मुंडे इफेक्ट', बनवेगिरी दिसताच जप्तीसह गुन्हाही नोंदविणार
बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे काही जणांनी विविध प्रकारच्या सोयी सवलती लाटल्या आहेत. असे अनेक बनावट दिव्यांग धडधाकट असतानाही महामंडळाच्या बसमध्ये ७५ टक्के तिकिट सवलत घेतात. मात्र आता दिव्यांग कल्याण आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या प्रकारावर आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. त्यांच्या निर्देशानुसार आता महामंडळाच्या यंत्रणेनेही एसटीतील दिव्यांगांवर नजर ठेवणे सुरू केले आहे. बस वाहकाच्या मोबाइल अॅपमध्ये दिव्यांगाचे यूडीआयडी कार्ड खरे की खोटे हे तपासण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रवासी आढळताच त्यांचे कार्ड जप्त करण्यासोबतच गुन्हाही दाखल केला जाणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
थंडी ओसरल्यानंतर पर्यटन आराखडे सुरू! पहिली पसंती ‘टिपेश्वर’ला, सुन्ना गेटवर होतंय वाघाचे दर्शन
महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या ‘यूडीआयडी’ कार्डची मोबाइल अॅपद्वारे पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी गुरुवारी (दि. २२) यवतमाळसह सर्व विभागीय नियंत्रकांना पत्र जारी केले आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच शासनाच्या विविध आदेशांनुसार एसटीमार्फत पात्र दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीचा गैरवापर रोखण्यासाठी पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार वाहतूक महाव्यवस्थापकांनी सर्व विभाग नियंत्रकांना पत्र दिले आहे. या पत्रानुसार एसटी बसेसमध्ये दिव्यांग प्रवाशांच्या ‘यूडीआयडी’ कार्डची मोबाइल अॅपद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. दिव्यांगाचे कार्ड वैध आढळल्यास संबंधित दिव्यांग प्रवाशास प्रवास सवलत देण्यात येईल.
मात्र, कार्ड बनावट अथवा अवैध असल्याचे निष्पन्न झाल्यास ते जप्त करून आगारात जमा करण्यात येणार असून, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६च्या कलम ९१ नुसार कायदेशीर कारवाईसह गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेल्या ओळखपत्रांची नोंद आगार व विभागीय स्तरावर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भातील मासिक अहवाल वाहतूक महाव्यवस्थापक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारवाई करताना प्रवाशांच्या तक्रारी उद्भवणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
एसटीतील सर्व वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच विभागीय कार्यालयांतील मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना ‘यूडीआयडी डिपार्टमेंट ऑफ इम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज’ हे मोबाइल अॅप डाउनलोड करून कार्ड तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अॅपद्वारे यूडीआयडी कार्ड क्रमांक व जन्मतारीख नोंदवून कार्ड वैध असल्याची खातरजमा केली जाणार आहे.
८८ एसटी प्रवासात कोणालाही बनावट दिव्यांग ओळखपत्राद्वारे सवलत घेता येणार नाही. एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकानी यूडीआयडी कार्डची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत, आपणही सर्व आगारांना तसेच तपासणी पथकांना अशी तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत – अमृत कच्छवे, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळ, यवतमाळ.