थंडी ओसरल्यानंतर पर्यटन आराखडे सुरू! पहिली पसंती 'टिपेश्वर'ला, सुन्ना गेटवर होतंय वाघाचे दर्शन
मागील काही दिवसात थंडीने चांगलाच जोर पकडला होता. अशावेळी अनेकांनी पर्यटनाचे बेत तुर्तास रद्द केले. मात्र आता थंडीचा जोर काहीसा ओसरला असल्याने अनेकांनी आपले पर्यटनाचे आराखडे सुरू केले आहे. जिल्ह्यात पर्यटनस्थळांची संख्या मर्यादित असली, तरी निसर्गसंपन्नता आणि हमखास व्याघ्रदर्शन यामुळे नागरिकांची पहिली पसंती टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यालाच मिळत आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असल्याने पर्यटकांना पहिल्याच सफारीत वाघदर्शनाचा अनुभव येतो. सध्या टिपेश्वर वनपरिक्षेत्रात दोन गेटवर २५ जंगल सफारी (जिप्सी) वाहने कार्यरत असून, वनविभागाकडून पर्यटकांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातून ऑफलाईनमधून दर महिन्यात ५ ते ७ लाख रुपयाचा महसूल मिळतो. १४८.६२ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, नीलगाय यांसह विविध वन्यप्राणी आढळतात. पानगळीच्या जंगलामुळे येथे समृद्ध जैवविविधता नांदते. अंजन आपटा, बहावा, बाभूळ, बेल, चिंच चंदन, हिरडा, जांभूळ, मोह, पळस, साग तेंदू, उंबर, वड यांसारख्या वृक्षप्रजाती जंगलाचे सौंदर्य वाढवतात.
टिपेश्वर अभयारण्यात अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. मात्र पहिल्याच टप्यात हमखास दर्शन होणाऱ्या वाघाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. सध्या येथे १८ ते २० च्या आसपास वाघांची संख्या आहे. यात ४ वाघ हे लहान आहेत. यासह बिवट, चितळ, अस्वल, निलगाय, मार या प्राण्यांचे वास्तव्य आहे. टिपेश्वरच्या सुन्ना गेटवरून तर वाघाचे हमखास दर्शन होत आहे.टिपेश्वर अभयारण्याला सुन्ना व कोदारी असे दोन गेट आहे. यातील सुन्ना गेटवरीत पिलखाना नाल्याजवळ हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याचे अधिका-यांनी सांगितले, पाण्याच उपलब्धता व दाट जंगलामुळे या परिसरात वाघांच यावर अधिक असून त्यामुळे पर्यटकांची विशेष गर्द होत आहे.






