दिवाळीच्या 6 दिवसांचा अर्थ काय? जाणून घ्या प्रत्येक दिवसाचे खास महत्व
Diwali 2025 Celebration : दिवाळी सण म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा सण. हा सण म्हणजे सत्याचा असत्यावर झालेला विजय! श्रद्धाळूंची अशी मान्यता आहे, की श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा अयोध्येत आले तेव्हा तेथील लोकांनी दीप प्रज्वलित केले. त्या दिवसापासून दिवाळी साजरा करण्यास सुरुवात झाली.
दिवाळीत आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना भेटतो. त्यांच्या सोबत वेळ घालवतो. त्यांना भेटवस्तू देतो. खरंतर दिवाळीत प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट महत्व आहे. आज आपण दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे खास महत्व आणि त्यामागील अर्थ जाणून घेऊयात.
भारतीय संस्कृतीत म्हणजेच हिंदू संस्कृतीत गायीला धार्मिक महत्व आहे. म्हणूनच तिला हिंदू धर्मात माता म्हटले गेले आहे. वसुबारसच्या दिवशी गायी आणि वासराची पूजा केली जाते. तसेच, या दिवशी गायीला गोड पदार्थ अर्पण करतात. तिला हळद कुंकवाचा तिलक लावून तिच्याभोवती प्रदक्षिणा घालतात.
Diwali 2025 : दिवाळीला फराळ बनविण्याची प्रथा कशी सुरू झाली? यामागे आहे रंजक गोष्ट
या शुभ दिवशी धन्वंतरी देव आणि महालक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी सोनं, चांदी आणि नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. कारण नवीन गोष्टी खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते अशी मान्यता आहे. म्हणूनच तर अनेक जण धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करतात.
याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वाढ केला. म्हणूनच या दिवसाला दुष्ट गोष्टींवर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक जण सुगंधित उटणे लावून अभ्यंग स्नान करतात. मराठी माणसाची पहिली दिवाळी म्हणून देखील नरक चतुर्दशी ओळखली जाते. या दिवशी दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम आयोजित होत असतात.
दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. या दिवशी देवी महालक्ष्मी, गणपती आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी घर स्वच्छ करून सुंदर रांगोळ्या काढल्या जातात, दरवाजावर तोरण बांधले जाते आणि दीपप्रज्वलनाने संपूर्ण घर उजळून निघते.
लक्ष्मीपूजनानंतरचा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा. या दिवशी राजा बली आणि भगवान विष्णू यांच्या भेटीचे स्मरण केले जाते. नवविवाहित जोडप्यांसाठी हा दिवस विशेष मानला जातो, कारण या दिवशी पती-पत्नी एकमेकांना आदराने भेटवस्तू देतात. तसेच या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते.
दिवाळीच्या शेवटच्या दिवशी साजरी केली जाणारी भाऊबीज हा प्रेम, स्नेह आणि भावंडांच्या नात्याचा सण आहे. बहिणी आपल्या भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.