दिवाळी म्हणजे उत्साह आणि मांगल्याचा सण. दिवाळी म्हटलं की, रांगोळी, कंदिल, पणत्या या आल्याच पण त्याचबरोबर फराळाची गोडी देखील तितकीच महत्वाची ठरते. फराळाशिवाय दिवाळी अपूर्णच. पुर्वीच्या काळी आजच्य़ा सारखं फराळ ऑनलाईन मिळत नव्हता. कुटुंबातील स्त्रिया एकत्र येत घरीच फराळ तयार करायच्या आणि शेजारी किंवा नातेवाईकांना हा फराळ दिला जायचा. फराळाची देवाण घेवाण आजंही होते, ही फराळ बनविण्याची प्रथा नेमकी कशी सुरु झाली याबाबत एक रंजक गोष्ट आहे.
घरात बनवलेला फराळ शेजाऱ्यांना देण्यात लहानपणी गंमत वाटायची. याच फऱाळाची प्रथा कशी सुरु झाली याबाबत किस्सों की दुनिया या इन्स्टाग्राम पेजवरुन सांगण्यात आलं आहे. खरंतर आपले सण आणि संस्कृती ऋतुचक्रावर आधारित आहे. दिवाळी शदर ऋतू म्हणजेच हिवाळ्यात येते. यावेळी शेतीची कामं झालेली असतात आणि धान्याची साठवणूक केली जाते. या थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा मिळावी यासाठी तूप, साखर गूळ आणि रवा हे फायदेशीर ठरतात. त्यामुळे य़ा जिन्नसांपासून प्रत्येकजण त्यांच्या आवडीप्रमाणे गोड आणि तिखट असे पदार्थ बनवायला लागले.
फराळाची प्रथा ६/१७ व्या शतकापासून सुरू झाली. ही प्रथा कशी सुरु झाली तर, असं म्हटलं जातं की, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे आपण जे काही बनवतोय जे काही करतोय ते दुसऱ्यांना देण्यात वाटून खाण्यात त्याला समाधान मिळतं. त्यामुळे हे पदार्थ जवळच्या नातेवाईंकांना देण्याची प्रशा सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दिवाळीला सैनिकांना फराळ देणं ही आनंदाची आणि ऐक्याची पद्धत मानली जायची. इतिहासात आणखी डोकावलं तर लक्षात येईल की, पेशवे कालीन दस्ताऐवजांमध्ये दिवाळी फराळ हा शब्ह आढळतो.
महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून दिवाळीला मित्रमंडळी आणि नातेवाईंकांकडे जाण्याची त्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरु आहे. त्यामुळे फराळ फक्त दिवाळीतील एक प्रथा नाही तर आपुलकी आणि स्नेहाचं प्रतीक देखील आहे. पूर्वीच्या काळी महिलांना वर्षभर घरकामात व्यस्त राहावे लागे. दिवाळीच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र बसून आनंदाने पदार्थ तयार करण्याची ही एक सामाजिक प्रथा बनली. यावेळी घराघरात गोड आणि तिखट पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ घरच्यांबरोबर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना देऊन सणाचा आनंद वाटला जातो.आज जरी बाजारात तयार फराळ सहज मिळत असला तरी अनेक कुटुंबांमध्ये अजूनही घरगुती फराळ बनवण्याची परंपरा जपली जाते. काहीजण मित्रांना व सहकाऱ्यांना फराळ देऊन आधुनिक पद्धतीनेही ही प्रथा पाळतात. थोडक्यात, दिवाळी फराळाची प्रथा ही आपुलकी, एकत्रितपणा आणि आनंद वाटण्याचं प्रतीक आहे.